सिकलसेलचे १० हजार वाहक
By Admin | Updated: December 31, 2015 02:15 IST2015-12-31T02:15:15+5:302015-12-31T02:15:15+5:30
गंभीर व अनुवांशिक सिकलसेलची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालयात

सिकलसेलचे १० हजार वाहक
\साडेसहा लाख नागरिकांची तपासणी : वर्धा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
गौरव देशमुख वर्धा
गंभीर व अनुवांशिक सिकलसेलची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालयात २००९ पासून तर जिल्ह्यात २०१०-११ पासून सुरू झाला. जिल्ह्यात १ ते ३० वयोगटातील ६ लाख ५८ हजार ६८५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ७९८ सिकलसेलग्रस्त रुग्ण तर ९ हजार ९८२ सिकलसेल वाहक आढळून आलेत. सदर रुग्णांना उपचारासाठी शासनाकडून औषधी पुरवठा होत आहे.
सिकलसेल आजारात लाल रक्तपेशी आपला गोल आकार बदलून कोयत्याच्या आकाराच्या बनतात. साधारण रक्तपेशी गोल असल्याने त्या शरिराच्या सर्व भागात रक्त वाहून नेतात. सिकलसेल आजार असलेल्या व्यक्तीच्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांतून रक्त वाहून नेऊ शकत नाही. त्या घट्ट आणि चिकट होतात. ते रक्तवाहिन्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण करतात. अवयवांना पुरेसे आॅक्सिजन न मिळाल्याने अवयव निकामी होतात. सिकलसेलग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांच्या रक्ताची तपासणी करण्याचे काम जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य उपकेंद्र आदी ठिकाणी होत आहे.
तीन पद्धतीने केली जाते सिकलसेलची तपासणी
सिकलसेल आजाराची तपासणी सोल्युबिलिटी, इलेक्ट्रोफोरेसिस आणि एचपीएलसी या पद्धतीने केली जाते. सोल्युबिलिटी चाचणी ही सर्व रुग्णालयांमध्ये होते; पण इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी आर्वी, हिंगणघाट व वर्धा सामान्य रुग्णालय या तीन ठिकाणीच केली जाते.
एचपीएलसी तपासणी मात्र नागपूर येथील एक शासकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील सर्वोपचारमध्ये करण्यात येते.
आई व वडील हे दोन्ही सिकलसेलग्रस्त वा वाहक असतील तर अपत्यांनाही हा आजार होतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व्यक्ती शोधून काढणे आणि त्यांचा आपापसातील विवाह टाळणे गरजेचे आहे.
औषधोपचाराकरिता सहाय्यता
समाज सिकलसेल मुक्त करण्यासाठी जनजागृती करणे तसेच या रुग्णांना नेहमी रक्त द्यावे लागत असल्याने रक्तदान करणे गरजेचे आहे. लग्नापूर्वीच सिकलसेल रक्त तपासणी करणे हाच निरोगी अपत्याला जन्म देण्याचा एकमेव व साधा उपाय आहे. यामुळे जोडप्यांनी सिकलसेलची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सदर रुग्णांना शासनाकडून आर्थिक मदतही केली जाते. रुग्णाला मोफत रक्त देण्यासोबतच औषध व उपचाराकरिता प्रशासन दरमहा ६०० रुपयांची मदत करते. मोफत तपासणी, ओळखपत्र, बालरूग्ण, अतिदक्षता विभागासह विविध सवलती दिल्या जातात.
हा रक्ताचा अनुवांशिक आजार असून कुटुंबातील सर्वांनी रक्त तपासणी करून घेणे गरजेचे आहे. हा आजार बरा होणारा नसला तरी औषधोपचार व आरोग्याची काळजी घेतल्यास आटोक्यात आणता येतो. औषधोपचार व रक्त तपासणी नि:शुल्क केली जाते.
- डॉ. डी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा
ताप येणे, छातीत दुखणे, श्वासोच्छवास त्रास होणे, थकवा, अशक्तता, निस्तेजपण, पोटदुखी, सांधे दुखी, डोके दुखी, झाव लागणे, वेदनाशामक गोळ्यांनी कमी न होणाऱ्या वेदना अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घेतली पाहिजे.
- तृप्ती देशमुख (वरखडे), औषध निर्माण अधिकारी, प्रा.आ. केंद्र, मांडगाव.