एका कृषी सहायकाला १० हेक्टरचे ‘टार्गेट’

By Admin | Updated: May 19, 2017 02:11 IST2017-05-19T02:11:30+5:302017-05-19T02:11:30+5:30

मातीत जन्मला, तिथेच मोठा झाला, वडिलांच्या आधाराने उपजत गुणातून शेती केली, आणि शासनाच्या

A 10-hectare "Target" to an Agriculture Assistant | एका कृषी सहायकाला १० हेक्टरचे ‘टार्गेट’

एका कृषी सहायकाला १० हेक्टरचे ‘टार्गेट’

शेतकऱ्यांना करणार प्रशिक्षित : सोयाबीन तूर कपाशीला प्राधान्य; प्रयोगानंतर मिळणार अनुदान
रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मातीत जन्मला, तिथेच मोठा झाला, वडिलांच्या आधाराने उपजत गुणातून शेती केली, आणि शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अखेर त्याच मातीत मिटणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने आता प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या माध्यमातून राबविण्यात येत आहे. याकरिता कृषी विभागाच्यावतीने एका कृषी सहायकाला त्याच्या कार्यक्षेत्रातील १० हेक्टर शेतीचे टार्गेट देण्यात आले आहे. शेतकरी शेती करताना पारंपरिक पद्धतीने करीत असल्याने उत्पन्नात घट होते, यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा उपक्रम राबविताना कृषी सहायकाला शेतकरी गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका गटात २५ शेतकरी राहणार आहेत. प्रत्येक गावात असे गट तयार करण्यात येणार आहे. या अभियानात कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकांच्या उत्पादन वाढीचे तंत्र शिकविण्यात येणार असल्याची माहिती आहे. यातही सोयाबीन जिल्हाभर तुरीचे प्रशिक्षण समुद्रपूर, आर्वी आणि कारंजा या भागात देण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना वर्धा, सेलू, देवळी या भागातील कृषी विभागाच्या नर्सरीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतात दिवसरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीत उत्पन्न घेण्याची कला अवगत आहे. त्याला गरज आहे ती केवळ त्याच्या शेतमालाला दर देण्याची. याचा विचार कोणतीही योजना राबविताना शासनाच्यावतीने करण्याची गरज शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

महाबीजकडून मिळणार बियाणे
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीजकडून मोफत बियाणे पुरविण्यात येणार आहे. गतवर्षी महाबीजचे बरेच बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याचा निपटारा अद्याप झाला नाही. मग पुन्हा महाबीजच्या बियाण्यांवर शेतकरी कसा विश्वास ठेवणार, हा प्रश्नच आहे.

खत आणि औषधांचा खर्च शेतकऱ्यांवरच
या अभियानात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने बियाणे मिळणार आहे. मात्र बियाणे अंकुरल्यानंतर त्यांना देण्यात येणारे खत आणि किडीच्या प्रादुर्भावानंतर त्यावर प्रतिबंध लावण्याकरिता लागणाऱ्या औषधांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. सोबतच मजुरीचा खर्चही त्यांच्याच माथ्यावर येणार आहे. हा सर्व खर्च प्रयोगानंतर शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे. जर हा प्रयोग अयशस्वी ठरला तर शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाकरिता नेहमीप्रमाणे चकरा मारण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

रोहिणी नक्षत्रापासून शुभारंभ
या अभियानाचा कृषी विभागाच्यावतीने रोहिणी नक्षत्रापासून शुभारंभ होणार आहे. याकरिता कृषी सहायकांकडून शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना माहिती देणे सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांकडून याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागातील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शेतकरी शेतीत करतात. त्याची त्यांना माहिती आहे, यात दुमत नाही; मात्र शेती करताना त्यांच्याकडून पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. यात उत्पन्न कमी होत आहे. यामुळे शासनाच्यावतीने ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. उर्वरीत खर्च प्रयोगानंतर अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
 

Web Title: A 10-hectare "Target" to an Agriculture Assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.