उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये ढिवसाढवळ्या मोबाईल दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटून नेल्याचा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चोर रोख रक्कम घेऊन पळून जात असल्याचे दिसून येते आणि दुकानदार त्याचा पाठलाग करत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक तरूण मोबाईलमध्ये रिचार्ज करण्याचा बहाण्याने दुकानात येतो आणि दुकानदाराला त्याच्या मोबाईलमध्ये रिचार्ज करायला सांगतो. काही मिनिटानंतर संबंधित तरूण त्याला २९ रुपयांचा आणखी एक रिचार्ज करायला सांगतो. दुकानदार रिचार्ज करत असताना चोरी करण्यासाठी आलेल्या तरुण आपल्या खिशातून मिरची पूड काढतो आणि दुकानदाराच्या डोळ्यात टाकतो. त्यानंतर दुकानातून रोख रक्कम घेऊन पळून जातो. दुकानदार तरुणाचा पाठलाग करतो. परंतु, तो त्याला पकडू शकला नाही. दुकानदाराने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याची विचारपूस केली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
@lokmanchtoday या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एका चोरट्याने मोबाईल दुकानाचा मालक सुहेलच्या डोळ्यात मिरची पूड घालून दुकानातील ५० हजार रुपये लुटले. ग्राहक असल्याचे भासवून चोरट्याने प्रथम १९ रुपयांचे आणि नंतर २९ रुपयांचे रिचार्ज केले. नंतर खिशातून मिरची पूड काढून दुकानदाराच्या डोळ्यात फेकली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून रस्त्याच्याकडेला दुकान असलेल्या मालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.