उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या टँकर आणि दुचाकीच्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही विद्यार्थी गौतम बुद्ध विद्यापीठाचे विद्यार्थी होते. पोलिसांनी सोमवारी या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बीटा-२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना एक्सप्रेसवेच्या चुहारपूर अंडरपासजवळ हा अपघात घडला. या अपघात मरण पावलेले तिन्ही विद्यार्थी दुचाकीवरून जेवण खरेदी करण्यासाठी पूर्वांचल सोसायटीजवळील एका ढाब्यावर जात होते. मात्र, रस्त्यात त्यांची दुचाकी झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला धडकली.
या धडकेत तिन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यापैकी दोघांना मृत घोषित केले. नंतर एका विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वयं सागर (वय, १९), कुश उपाध्याय (वय, २१) आणि समर्थ पुंडीर (वय, १८) अशी मृतांची नावे आहेत.