उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोमवारी लखनौ येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएसआयआर स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २०२५ च्या समारोप सोहळ्यामध्ये सहभागी झाले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी येथील प्रदर्शनामधील विविध स्टार्टअप उत्पादनांची पाहणी केली. तसेच आपल्या भाषणामधून उत्तर प्रदेशने गेल्या काही काळात मिळवलेलं यश आणि भविष्यातील दिशा सर्वांसमोर मांडली. योगी म्हणाले की, उत्तर प्रदेशने गेल्या आठ वर्षांमध्ये सुरक्षेचं उत्कृष्ट वातावरण दिलं आहे. आज उत्तर प्रदेश फियरलेस बिझनेसचं केंद्र बनलं आहे. ईज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये उत्तर प्रदेश अग्रणी आहे. आता ट्रस्ट ऑफ डुईंग बिझनेस उत्तर प्रदेशची नवी ओळख आहे. व्यवसायासाठी सुरक्षा, सुगमता आणि मजबूत इकोसिस्टिम आवश्यक आहे, तसेच या तिन्ही गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये उपलब्ध आहेत.
योगी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकार केवळ धोरण आखत नाही आहे तर तरुण, उद्योजक आमि शास्त्रज्ञांच्या विचारांना भरारी देत आहे. सरकार प्रत्येक योग्य स्टार्टअपसोबत उभं आहे. आम्ही प्रयोगशाळेपासून उद्योगापर्यंत तरुणांना साथ देत आहोत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक शोध हा उत्पादन बनेल, प्रत्येक उत्पादन उद्योग बनलं पाहिजे आणि प्रत्येक उद्योग भारताची शक्ती बनला पाहिले. हाच विकसित भारत आणि विकसित उत्तर प्रदेशचा मंत्र आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जेवढी गुंतवणूक होईल, समाज तेवढाच प्रगतीशील बनेल. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. योगी पुढे म्हणाले की, येथे चारही केंद्रीय प्रयोगशाळा एनबीआरआय, सीडीआरआय, आयआयटीआर आणि सीमेपच्या संचालकांनी भविष्याची कार्ययोजना सादर केली. त्यांनी सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जेवढी गुंतवणूक होईल, तेवढा समाज प्रगतीशील होईल आणि तोच देश आणि जगात नेतृत्व करेल, असेही योगी म्हणाले.
योगी पुढे म्हणाले की, गेल्या ११ वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप इकोसिस्टिम वेगाने वाढली आहे. आज भारतामध्ये १ लाख ९० हजार स्टार्टअप आहेत. आता आम्ही अमेरिका आणि ब्रिटननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहोत. तरुणांनी नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे बनले पाहिजे, असा पंतप्रधानांचा विचार आहे. तीच संकल्पना उत्तर प्रदेशने भक्कमपणे पुढे नेली आहे. राज्यात १७ हजारांहून अधिक अधिक स्टार्टअप सक्रिय आहेत. तसेत त्यामध्ये ८ युनिकॉर्नचा समावेश आहे. येथे ७२ इनक्युबेटर्स आणि ७ सेंटर ऑफ एक्सिलेन्स स्थापन झाल्या आहेत. स्टार्टअस्पसला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने १३७ कोटी रुपयांचं सहाय्य उपलब्ध करण्यात आले आहे, असेही योगी म्हणाले.