राजेंद्र कुमार
लखनौ :उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात सोमवारी सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’चे तीन अतिरेकी मारले गेले. जसनप्रीतसिंग (वय १८), वारिंदरसिंग (२३) आणि गुरुविंदरसिंग (२५) अशी तिघांची नावे असून ते पंजाबच्या गुरुदासपूरचे रहिवासी आहेत. १९ डिसेंबर रोजी बख्शीवाल पोलिस चौकीवर हातबॉम्ब फेकून हे अतिरेकी फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब पोलिसांनी संयुक्त मोहीम आखली. यात झालेल्या गोळीबारात तिघेही मारले गेले.
पीलीभीतचे पोलिस अधीक्षक अविनाश पांडेय यांच्यानुसार, अतिरेकी पुरनपूर भागात लपले होते. शोध सुरु असताना तिघे दुचाकीवर पळाले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना माथोटांडाजवळ त्यांना घेरले. तिथे झालेल्या चकमकीत ते मारले गेले.
गुप्तचरांनी दिली टीप
चकमकीनंतर उत्तर प्रदेशातील सखल भागाचे खलिस्तानी अतिरेक्यांशी असलेले संबंध पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत. याच भागात खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रिय होत असल्याची माहिती गुप्तचरांमार्फत मिळाली होती.