जमीन विक्रीच्या व्यवहारात खासदार महोदयांनाच चुना लावण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी भूमाफियांवर राजकारण्यांचा वरदहस्त असतो, अनेक ठिकाणी राजकारणीच भूमाफिया असतात. परंतू, खासदारालाच दीड कोटींना चुना लावण्यात आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.
प्रतापगढचे सपाचे खासदार आणि लखनऊ पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक डॉ. एसपी सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी जमीन आणि दोन दुकाने अशी मालमत्ता आनंद नगरच्या भूमिका कक्कड यांच्याकडून घेतली होती. खरेदीखतही केले गेले. परंतू, जेव्हा ताबा घेतला तेव्हा त्यांना या मालमत्तेवर बँकेचे कर्ज असल्याचे समोर आले. एवढेच नाही तर या मालमत्तेचा करही थकीत असल्याचे समोर आले.
यामुळे सिंह यांनी आलमबाग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. आनंद नगरमध्ये शाळेची शाखा आहे. या शाळेच्या बाजुची जमीन शाळेच्या कामासाठी हवी होती. भूमिका कक्कर आणि तिचे काका विनोद कुमार यांची ती जागा होती. भूमिका आणि तिची बहीण शिल्पी यांची दुकाने या जमिनीवर बांधण्यात आली होती. जमीन आणि दुकाने याचा व्यवहार २.८० कोटी रुपयांना झाला. यापैकी १.६० कोटी रुपये भूमिकाला मिळाले होते. दोन्ही दुकाने रिकामी करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. भुमिकाच्या वाट्याच्या जमिनीवर महापालिकेचा २४ हजार रुपयांचा कर थकीत असल्याचे समजले. तसेच यामुळे ही जागा महापालिकेने सील केली होती.
२४ हजार छोटी रक्कम असल्याने सिंह यांनी ती पालिकेत भरली होती. परंतू कर भरल्यानंतर या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे २०१९ मध्ये लाखोंचे कर्ज घेतल्याचे समोर आले. भूमिकाने कर्जाचा हप्ता न भरल्याने बँक कर्मचारी तिथे आले होते. आता हे कर्ज असल्याने बँकेच्या परवानगीशिवाय ही जागा विकता येत नाही, तरीही खरेदीखत झाले होते. यामुळे फसवणूक झाल्याचे समजताच सिंह यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.