जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना वीरमरण आलं आहे. हे वृत्त समजल्यापासून या वीर जवानांच्या घरांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. या चकमकीत उत्तर प्रदेशमधील कॅप्टन शुभम गुप्ता यांनाही वीरमरण आलं आहे. या शोकाकूल वातावरणात उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमधील मंत्री योगेंद्र उपाध्याय हुतात्मा शुभम गुप्ता याच्या आग्रा येथील घरी पोहोचले. हुतात्मा शुभमच्या आईवडिलांच्या हातात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावतीने ५० लाख रुपयांचा चेक दिला. मात्र तिथे फोटो काढण्यासही सुरुवात झाल्याने हुतात्मा जवानाची आई संतप्त झाली.
शोकाकूल वातावरणामध्ये बुडालेल्या घराच्या दारातच मंत्र्यांनी वृद्ध आईला कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्या हातून चेक दिला. यादरम्यान, मंत्र्यांसोबत तिथे फोटो काढणारेही हजर झाले. त्यांना पाहून हुतात्मा शुभमच्या आईला राग अनावर झाला. इथे प्रदर्शन भरवू नका, माझ्या मुलाला बोलावून आणा, असे तिने सुनावले. हा प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेले लोक निशब्द झाले. त्यानंतर शोक अनावर झालेल्या शुभमच्या आईला कुटुंबीयांनी सावरलं.
आग्रा येथील शुभम गुप्ता यांना राजौरी येथील बाजीमाल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत वीरमरण आले. नातेवाईक शुभम यांच्या विवाहाची तयारी करत होते. त्याचदरम्यान, शुभम यांच्या हौतात्म्याचं वृत्त धडकलं होतं.