पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी लखनौ येथून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सेवा पंधरवडा-२०२५ ला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि राज्यातील २५ कोटी नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सेवा पखवाडा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत चालेल. या कालावधीत, समाजाला एकत्र आणणारे विविध सर्जनशील उपक्रम राबवले जातील, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सुरू होत आहे, हे आपले भाग्य आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील सर्वात दूरदर्शी आणि लोकप्रिय नेते आहेत. आज संपूर्ण जग पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एका नवीन भारताचे दर्शन करत आहे. जो भारत कधी मागे पडलेला भारत मानला जात होता, तो आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज जगाला प्रेरणा देत आहे.”
११ वर्षांच्या कामगिरीचं कौतुक -पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील कामगिरीचा पाढा वाचताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “गेल्या ११ वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले आहे. अर्थव्यवस्था, वारसा, पायाभूत सुविधा, गुंतवणूक,रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी विकास आणि जलसंपदा आदी अनेक क्षेत्रांत नवे आदर्श प्रस्थापित केले आहेत. एवढेच नाही तर, गावे, गरीब, शेतकरी, तरुण, महिला, दलित आणि वंचितांना प्राधान्य दिल्याने प्रत्येक नागरिकाच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. म्हणूनच गेल्या ११ वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, असेही योगी म्हणाले.
रामलला ते महाकाल लोकपर्यंत आस्था आणि वारशाचा सन्मान -योगी आदित्यनाथ म्हणाले, वारशाचा आदर आता केवळ घोषणाच नाही तर प्रत्यक्षात दिसत आहे. ५०० वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम लला मंदिर बांधण्यात आले. काशी विश्वनाथ धामचे पुनर्निर्माण जागाचे लक्ष वेधून घेत आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचा कायाकल्प झाला आहेत. महाकाल लोकचे बांधकाम आणि इतर धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण हे नवीन भारताचे वैशिष्ट्य बनले आहे. याशिवाय, बाबा साहेब डॉ. भीमराव आंबेडकर, संत रविदास आणि महर्षी वाल्मिकी यांसारख्या महापुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक सर्जनशील कामे करण्यात आली आहेत, जी सामाजिक न्याय आणि सामाजिक उन्नतीच्या दिशेने मैलाचा दगड ठरली आहेत, असेही योगी म्हणाले. याव्यतिरिक्त, कोरोना काळातील कार्य, आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील कार्य, अशा अनेक गोष्टींवर योगी आदित्यनाथ यांनी यावेली प्रकाश टाकला.