उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील लाकूड बाजारात भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले. लोकांनी तत्काळ पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. आग कशी लागली याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ज्या फिरोजाबाद मार्केटमध्ये आग लागली तेथे सुमारे 300 छोटी-मोठी दुकाने असून, या ठिकाणी लाकडी फर्निचर, फ्रेम्स, बोर्ड, प्लाय या वस्तुंची विक्री होते. फिरोजाबाद येथील अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर आग्रा आणि एटा येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या टिंबर मार्केटला लागलेली आग विझवण्याची व्यवस्था का होत नाही, असं म्हणत लोक संताप व्यक्त करत आहेत. दोन वर्षांपूर्वीही या मार्केटमध्ये आग लागली होती.
सर्व काही उद्ध्वस्त
150 दुकानं जळून खाक झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. फिरोजाबाद सदरचे आमदार मनीष असिजा, महानगरपालिकेच्या महापौर कामिनी राठोड, पोलीस अधीक्षक सर्वेश कुमार मिश्रा, सीओ सिटी कमलेश कुमार आणि अनेक पोलीस ठाण्यांतील फौजफाट्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त आहे. सरोज देवी म्हणाल्या की, त्यांची दोन दुकानं होती, सर्व काही जळून खाक झालं आहे. काहीच उरलं नाही.
कोट्यवधींचं झालं नुकसान
प्रमोद कुमार म्हणाले की, प्रशासनाला येथील दुकाने रिकामी करायची आहेत. त्यामुळे षड्यंत्र रचले जाते. कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. सर्वचं उद्धवस्त झालं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार मनीष असिजा यांनी सांगितले की, ही आग कशी लागली हे माहीत नाही, मात्र मोठं नुकसान झालं आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.