उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे एका रंगेल तरुणाला महिलेची छेड काढणं चांगलंच महागात पडलंय. ही महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी या तरुणाला त्याच्या घराबाहेर पकडून बेदम चोप दिला. पीडित महिला फुटपाथवर दुकान लावून चपला विक्रीचा व्यवसाय करते. दरम्यान, आरोपी तरुण दररोज तिच्याजवळून जाताना अश्लील कृत्य करायचा. याबाबत महिलेच्या कुटुंबीयांनी सदर तरुणाला बऱ्याचदा समज दिली होती. मात्र त्याच्यामध्ये काहीच फरक पडला नव्हता. महिलेने केलेल्या आरोपानुसार अमित नावाचा हा तरुण जेव्हा जेव्हा दुकानाजवळून जायचा तेव्हा तेव्हा नेहमी छेडछाड आणि अश्लील कमेंट् करायचा. याबाबत आपण आणि आपल्या कुटुंबीयांनी त्याला अनेकदा समज दिली. मात्र तरीही या तरुणाच्या वर्तनामध्ये काहीही फरक पडला नाही.
मंगळवारी संध्याकाळी हा तरुण या रस्त्याने जात होता. तेव्हा त्याने सुरुवातीला या महिलेला नमस्कार म्हणत अभिवादन केलं. मात्र नंतर आय लव्ह यू म्हणून तिथून जाऊ लागला. तेव्हा संतापलेल्या महिलेने या प्रकाराची माहिती पती आणि भावाला दिली. त्यानंतर या तरुणाला महिलेले चपलेने मारहाण केली. दरम्यान, घटनास्थळावर खूप गर्दी झाली. तसेच पोलीसही दाखल झाले.
मात्र या प्रकाराबाबत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे कुठलीही तक्रार दिलेली नाही. स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर या तरुणाला ताकिद देऊन सोडण्यात आलं. आरोपी तरुण हा पायांनी दिव्यांग असल्याचीही माहिती समोर येत आहे.