उत्तर प्रदेशमध्येकाँग्रेसने विधानसभेला घेराव घालण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. आंदोलनादरम्यान मार लागल्याने या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी केला आहे.
प्रभात पांडे असे मृत्यू झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव आहे. ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी गोरखपूर येथून आले होते. त्यांचा मृतदेह सिव्हिल रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तसेच रुग्णालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी सरकराने काटेरी खिळे लावले होते, असा दावाही काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी आरोप केला की, पोलीस आणि प्रशासनाने परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्याने प्रभात पांडे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यादरम्यान माझा आणि इतर काही कार्यकर्त्यांचाही गळा आवळला. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली गेली पाहिजे. आमच्या वाटेत काटेरी तारा पसरवल्या गेल्या. आता शवविच्छेदनामधून प्रभात यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूचं वृत्त समजल्यानंतर उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी सिव्हिल रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी सांगितले की, सदर काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसच्या कार्यालयात मृतावस्थेत सापडला होता. त्याला रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सरकार मृताच्या कुटुंबीयांसोबत उभं आहे. सध्यातरी त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजलेलं नाही. शवविच्छेदनानंतर याबाबतची नेमकी माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले.