Worrying: Weighing less than two thousand children in Osmanabad ! | चिंताजनक : उस्मानाबादेत दोन हजार बालके कमी वजनाची !
चिंताजनक : उस्मानाबादेत दोन हजार बालके कमी वजनाची !

ठळक मुद्देनीति आयोगाने जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश झाला.कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.

उस्मानाबाद : नीति आयोगाने जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश झाला. मागील वर्षभरात महिला व बालकल्याण, आरोग्य आणि शिक्षण या तीन घटकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. यानंतरही कमी वजनाची बालके जन्मण्याचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मार्च २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत कमी वजनची  सुमारे २ हजार बालके जन्मली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण पाऊण टक्क्याने वाढले आहे, हे विशेष.

जिल्हा एकदोन वर्षाआड दुष्काळाचा सामना करीत आहे. या कालावधीत शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडते. अशा आर्थिक विवंचनेतूनच विशेषत: ग्रामीण भागातील अनेक कुटुंब कमी वयातच मुलीचा विवाह लावून देतात. एवढेच नाही तर हालाखीची परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबातील गरोदर मातांना संतुलित व सकस आहार मिळत नाही. गरोदार मातेला एखादा आजार जडल्यानंतर त्याचे वेळीच निदान होत नाही. आणि निदान झालेच तर आर्थिक अडचणींमुळे उपचार करता येत नाहीत. अशा एक ना अनेक कारणांमुळे कमी वजनाची मुले जन्मतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मार्च २०१८ पूर्वी जिल्ह्यात २४ हजार ५४८ बालके जन्मली. यापैकी तब्बल १ हजार ९३४ बालके कमी वजनाची (२ हजार ५०० ग्रॅम पेक्षा कमी वजन) होती. तेव्हा सर्वाधिक चिंतानजक स्थिती तुळजापूर आणि वाशी तालुक्यात होती. अनुक्रमे ११.८८ व १०.६० टक्के कमी वजनाच्या बाळांचे प्रमाण होते. 

दरम्यानच्या काळात केंद्र शासनाच्या नीति आयोगाने मागास जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश केला. या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे कमी वजनाची बालके जन्मण्याचे प्रमाण कमी होईल, असे अपेक्षित होते. परंतु, सध्या उलट चित्र पहावयास मिळत आहे. कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. मार्च २०१९ पूर्वी २२ हजार ७९८ बालके जन्मली. यापैकी १ हजार ९६६ बालके कमी वजनाची आहेत. मार्च २०१८ च्या तुलनेत जवळपास पाऊण टक्क्याने कमी वजनाच्या बालकांची संख्या वाढली आहे. 

दृष्टिक्षेपात कमी वजनाची बालके
तालुका     संख्या    टक्केवारी
भूम        ४०    ४.७६
कळंब        ११५    ७.५
लोहारा        १०३    ६.७०
उमरगा        ३३०    ७.७६
उस्मानाबाद    ८४२    ८.९.
परंडा        १००    ७.४२
तुळजापूर    ३७०    ११.७६
वाशी        ६६    ११.४४
एकूण        १९६६    ८.६२


Web Title: Worrying: Weighing less than two thousand children in Osmanabad !
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.