In the second wave, the number of patients crossed 500 in a few days | दुसऱ्या लाटेत काही दिवसातच रुग्णसंख्या पाचशे पार

दुसऱ्या लाटेत काही दिवसातच रुग्णसंख्या पाचशे पार

कळंब : पहिल्या लाटेत नऊ महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या दोन हजारापार गेली होती. आता दुसऱ्या लाटेत अवघ्या काही दिवसातच आकडा पाचशे पार झाल्याने गंभीर वृद्धी नोंदली गेली आहे. या स्थितीत गावगाड्यात मात्र मागच्या सारखी यंत्रणा ‘अ‍ॅक्टिव्ह’ दिसत नसून मास्क, डिस्टन्स, ट्रेसिंग यावर दुर्लक्ष दिसत असतानाच घोळक्यांना, टोळक्यांना अन् यामधील टाेळक्यांना नेमका ‘आवर’ घालायचा कोणी असा चिंतेत भर घालणारा प्रश्न पडत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’ झाले होते. यानंतर पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा व स्थानिक लोकांच्या मदतीने या लॉकडाऊनचा काटेकोर अंमल झाला होता. जिल्हाबंदी झाल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातून गावगाड्यात येणाऱ्या लोकांवर मर्यादा आल्या होत्या. गावागावात कोरोना कक्ष कार्यान्वित झाले होते. अंगणवाडी सेविका ते आशाताई ‘डोअर टू डोअर’ शोध घेत होत्या तर गावागावात गुरूजींनी ही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलीस अन् पोलीस पाटील तसेच कोतवालांच्या हातातील काठीचा लोकांत धाक होता. एकूणच कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावगाड्यात प्रशासन सातत्याने ‘अ‍ॅक्टिव्ह’ मोडवर होते. गटविकास अधिकारी ते तहसीलदार यांच्या ‘व्हिजिट’ ते ‘कंटेन्टमेंट’ करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी यांची धावपळ असायची. एवढ्या तगड्या ‘नाकाबंदी’चा सामना करतही कोरोनाने तालुक्यातील सत्तरेक गावाची वेस ओलांडली होती.

एप्रिल ते डिसेंबर या काळात जवळपास १ हजार ३०० बाधित रूग्णांची गावगाड्यात नोंद झाली होती. शहरातील ८०० रूग्णांच्या तुलनेत हा आकडा तसा दखलपात्रच होता. यात ग्रामीण भागातील ३५ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. शिराढोण, डिकसळ, येरमाळा, मस्सा आदी गावात वाढत्या रूग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण झाले होते. एकूणच पहिल्या लाटेतही कोरोनाने तालुक्यातील प्रशासन व जनतेला ‘गांभीर्याने घ्या’ असा संदेश दिला होता. तद्नंतर अनलॉकच्या पर्वात रूग्णांची संख्या कमी होत असल्याने अनेकांनी सुस्कारा टाकला असतानाच हळूहळू दुसऱ्या लाटेचा प्रकोप अधिक वेगाने आपली व्याप्ती वाढवत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या सव्वा महिन्यात हा आकडा पाचशेच्या घरात पोहचला आहे. यामुळे पहिल्या लाटेचे दोन हजार अन् दुसऱ्या लाटेतील अवघ्या काही दिवसातील पाचशेचा आकडा निश्चितच धास्ती वाढवणारा असा आहे.

चौकट...

घोळक्यांचा अन् टोळक्यांचा बंदोबस्त कोण करणार

दुसऱ्या लाटेत कोरोना अधिक गंभीर बनत चालला आहे. आकडा वाढत आहे. स्थिती बिघडत चालली आहे. असे असले तरी मास्क, हायजीन आणि फिजिकल डिस्टन्स हे वैयक्तिक पातळीवरील ‘सुरक्षा कवच’ अनेकांच्या लेखी गौण दिसून येत आहे. गावोगावच्या पारावर, कट्‌ट्यावर, चौकात, बसथांब्यावर अकारण थांबणाऱ्या, चर्चेचं गुऱ्हाळ चालणाऱ्या टोळक्यांचा वावर दिसून येत आहे. गांभीर्यांचा अभाव असणाऱ्या या टोळक्यांतील ‘टाेळक्यांना’ कोण आवर घालणार? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

त्यांना पुन्हा ‘सतर्क’ करावे लागेल

वैयक्तिक पातळीवर बेलगाम वागत असलेल्या लोकांना आवर घालण्यासाठी गावपातळीवरच्या प्रशासनाला अ‍ॅक्टिव्ह करावे लागणार आहे. स्थानिक ग्रा. पं., कोरोना योद्धे, ग्रामरक्षा दल, पोलीस पाटील, कोतवाल यांनी संयुक्तरीत्या मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक यासह सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देणे गरजेच आहे. हॉटस्पॉटवरून आलेले लोक, होम आयसोलेशन, हाय व लो रिस्क कॉन्टॅक्ट, कंटेन्टमेंट यावर ‘फोकस’ करणे गरजेचं आहे. तरच येणाऱ्या काळात वाढत्या आलेख उतरता होण्याची शक्यता आहे.

Web Title: In the second wave, the number of patients crossed 500 in a few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.