रानकवी महानोरांच्या हस्ते होणार उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 07:15 PM2019-12-14T19:15:55+5:302019-12-14T19:30:23+5:30

साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११ व १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे होणार आहे.

Sahitya Sanmelan to be inaugurated by N.D. Mahanore at Usmanabad | रानकवी महानोरांच्या हस्ते होणार उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन

रानकवी महानोरांच्या हस्ते होणार उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देसंमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे.हे संमेलन अधिकाधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्फत आखणी सुरू आहे.

उस्मानाबाद : ९३ वे अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलन येत्या जानेवारी महिन्यात उस्मानाबाद येथे होऊ घातले आहे़ या संमेलनाचे उद्घाटन रानकवी पद्मश्री ना़धों़ महानोर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शुक्रवारी स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली़

साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११ व १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे होणार आहे. या संमेलनाचे आयोजक मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने जय्यत तयारी केली आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे. हे संमेलन अधिकाधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्फत आखणी सुरू आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून जगभरातील मराठी भाषाप्रेमींवर आपल्या साहित्यप्रतिभेने मोहिनी घातलेले ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना निमंत्रित करण्यात आले होते.

उस्मानाबादकरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्घाटन सोहळ्यास येण्याचे मान्य केल्याचेही स्वागताध्यक्ष तावडे म्हणाले़ महानोर यांच्या लेखणीतून साकारलेली अजिंठा, कापूस खोडवा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पळसखेडची गाणी, पक्ष्यांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता, यशवंतराव चव्हाण, रानातल्या कविता, शरद पवार आणि मी, शेती, आत्मनाश व संजीवन ही पुस्तके वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ही गाणी महाराष्ट्रातील तरुणांसह सर्वच रसिकजनांच्या ओठी आजही रेंगाळतात. 

संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात
ना. धों. महानोर यांना भारत सरकारने १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. सन २००० साली त्यांच्या पानझड या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार आणि २००९ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संमेलनात तीन दिवस चालणाऱ्या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा मिळणार आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार असल्याचेही नितीन तावडे म्हणाले़ 

Web Title: Sahitya Sanmelan to be inaugurated by N.D. Mahanore at Usmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.