धान्याची खात्री करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:47+5:302021-03-05T04:32:47+5:30

डॉ. विजयकुमार फड : शालेय पोषण आहार योजनेबाबत घेतली बैठक उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्राथमिक विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शालेय पोषण ...

It is the headmaster's responsibility to ensure the grain | धान्याची खात्री करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची

धान्याची खात्री करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची

googlenewsNext

डॉ. विजयकुमार फड : शालेय पोषण आहार योजनेबाबत घेतली बैठक

उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्राथमिक विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गतच्या तांदू व धान्याचा पुरवठा मागणीप्रमाणे पुरवठादाराकडून प्राप्त झाल्याची खात्री करून घेण्याची जबाबदारी ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी दिले. शिक्षण विभागांतर्गत बैठकीत ते बोलत होते.

जिल्ह्यात काही शाळांवर पुरवठादांराकडून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तांदूळ व धान्य कमी प्रमाणात आल्याबाबत प्रसारमाध्यमामधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यानुषंगाने त्या बातम्यांची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १ हजार ५३८ जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अनुदानित शाळा आहेत. जिल्ह्यात एकूण १ लाख ७४ हजार ६५४ एवढे लाभार्थी विद्यार्थी आहेत. त्यासाठी दरमहा सरासरी ४४२ मे. टन तांदूळ शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाकडून प्राप्त होतो. पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने मालाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनात इलेक्ट्रॉनिक वजन काटा ठेवणे बंधनकारक आहे. तसेच मुख्याध्यापकाने माल उतरवून घेताना वजन करूनच घेणे आणि जेवढे वजन भरेल तेवढीच पोहोचपावती देणे आवश्यक आहे. कंत्राटदाराकडून मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्यास मुख्याध्यापकाने तसे वरिष्ठांना कळवावे, असेही डॉ. फड म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. अरविंद मोहरे, लेखाधिकारी सोनवणे, उपशिक्षणाधिकारी उद्धव सांगळे, अधीक्षक सुरेश वाघमारे, कथले आदी उपस्थित होते.

चौकट.......

पालकांनीही खात्री करावी

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठीचा तांदूळ आणि धान्य आदी माल पालकांना शाळेकडून दिला जात आहे. तेव्हा पालकांनीसुद्वा आपणास प्राप्त झालेले धान्य हे ठरवून दिलेल्या प्रमाणातच आहे किंवा कसे याची खात्री करून घ्यावी. धान्य कमी असल्याचे दिसल्यावर मुख्याध्यापकाकडे तक्रार करावी, असे निर्देश शाळास्तरावर सर्व मुख्याध्यापकांना देण्याच्या सूचना डॉ. फड यांनी शिक्षण विभागातील उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना दिल्या.

Web Title: It is the headmaster's responsibility to ensure the grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.