Gram Panchayat n special room closes; Notice to teachers including gramsewak! | ग्रामपंचायती, कक्ष बंद ठेवणे भोवले; ग्रामसेवकांसह शिक्षकांना नोटीस !

ग्रामपंचायती, कक्ष बंद ठेवणे भोवले; ग्रामसेवकांसह शिक्षकांना नोटीस !

ठळक मुद्देगटविकास अधिका-यांकडून कार्यवाही

ईट (जि. उस्मानाबाद) : कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असतानाही अनेक ग्रामपंचायती गंभीर नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आणला होता. सदरील बाब भूम पंचायत समितीचे गटविकास अधिका-यांनी गांभीर्याने घेत संबंधित ग्रामसेवकांसह शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस २८ मार्च रोजी बजावली आहे. २४ तासांच्या आत प्रत्यक्ष हजार राहून खुलासा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्येही कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. दिवसागणिक बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वी मोठ्या शहरांतील असंख्य लोक आपल्या मूळ गावी परतले आहेत. अक्षरश: गावेची गावे गर्दीने फुलून गेली आहेत. दरम्यान, अशा लोकांची नोंदणी करण्यासोबतच अन्य मदतीसाठी ग्रामपंचायत स्तरावर कोरोना सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले होते. हे कक्ष २४ तास सुरू ठेवण्याबाबत आदेशात नमूद आहे.

त्यानुसार बहुतांश ग्रामपंचायतींनी कक्ष स्थापन करून कामकाज सुरू केले आहे. अनेक ग्रामपंचायतीतील सहाय्यता कक्ष अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहेत. याचा फायदा संबंधित गावांतील लोकांना होत आहे. असे असतानाच दुसरीकडे काही ग्रामपंचायती कोरोनाच्या संसर्गाबाबत फारशा गंभीर नसल्याचे ‘लोकमत’ने २७ मार्च रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले होते. भूम तालुक्यातील पखरूड येथील ग्रामपंचायत व तेथील कक्षही कुलूप बंद होता. अशा काळात गावातील आरोग्य उपकेंद्र सुरू असणे गरजेचे होते. परंतु, तेही बंदच दिसून आले. लांजेश्वर या गावात बाहेरून शंभर ते दीडशे लोक आले आहेत. परंतु, त्यांची नोंद घेतलेली नाही. एवढेच नाही तर सहाय्यता कक्षही कुलूपबंद होता. आंद्रुड गावातही काही वेगळी स्थिती नव्हती. घाटनांदूर आणि नागेवाडी ग्रामपंचायतींची कार्यालये कुलूपबंद होती.

यापैकी काही ग्रामपंचायतींना नायब तहसीलदार यांनी भेट दिली होती. त्यांच्याही तपासणीत विदारक वास्तव समोर आले. ही बाब गांभीर्याने घेत संधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच नियुक्ती केलेल्या शिक्षकांना गटविकास अधिकाºयांनी २८ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत समक्ष उपस्थित राहून नोटिसेचा खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास वा समाधानकारक नसल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे नोटिसेत म्हटले आहे.

यांना बजावली नोटीस
पखरूड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सी. आर. मोटे, आंद्रुड जिल्हा परिषद शाळेवरील सहशिक्षक बालाजी नवनाथ पवार, घाटनांदूर शाळेचे शिक्षक बालाजी तुळशीराम कुटे, नागेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. जी. हुंबे आणि लांजेश्वरचे ग्रामसेवक एस. ए. बनसोडे यांना गटविकास अधिका-यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

Web Title: Gram Panchayat n special room closes; Notice to teachers including gramsewak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.