जिल्ह्यात ५ दिवसांचा जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:02+5:302021-05-08T04:35:02+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात ब्रेक द चेन अभियानांतर्गत घालून दिलेल्या निर्बंधाचे सर्रास उल्लंघन सुरू होते. परिणामी, रुग्णांची वाढ थांबत नव्हती. ...

5 day public curfew in the district | जिल्ह्यात ५ दिवसांचा जनता कर्फ्यू

जिल्ह्यात ५ दिवसांचा जनता कर्फ्यू

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यात ब्रेक द चेन अभियानांतर्गत घालून दिलेल्या निर्बंधाचे सर्रास उल्लंघन सुरू होते. परिणामी, रुग्णांची वाढ थांबत नव्हती. रस्त्यावर वर्दळही कायम राहिल्याने संसर्गाची साखळी तुटण्यात अडथळा निर्माण झाला होता. याअनुषंगाने विविध संस्था, संघटना, पदाधिकाऱ्यांनीही संपूर्ण लॉकडाऊनची मागणी सुरू केली. या बाबी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी ८ ते १३ मे या कालावधीत जनता कर्फ्यू लागू केला आहे.

सध्या जिल्ह्यात ब्रेक द चेन अभियानांतर्गत बरेचसे निर्बंध घालून देण्यात आले आहेत. याशिवाय, शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊनही सुरू आहे. मात्र, नागरिकांकडून या अभियानांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. बाजारपेठेत, रस्त्यावर दिवसभर वर्दळ सुरूच आहे. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी काही तुटली नाही. ब्रेक द चेन अभियानाच्या पूर्वीच्या १५ दिवसात साडेसहा हजार रुग्ण आढळून आले होते. अभियानाच्या कालावधीतील १५ दिवसांत चाचण्या जवळपास दुप्पट करण्यात आल्या. रुग्णसंख्याही ११ हजाराने वाढली. मात्र, यात पॉझिटिव्हिटी रेट हा कायम राहिला. हा रेट कमी झाला असता तर या अभियानाचे फलित दिसून आले असते. दरम्यान, या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आता ५ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. ८ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून १३ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अर्थात संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. या काळात संचारावर कडक निर्बंध असणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, नागरिकांनाच बाहेर पडता येणार आहे. शिवाय, आस्थापनाही या वर्गवारीतीलच सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.

केवळ याच बाबी राहतील सुरू...

वैद्यकीय : दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, मेडिकल, चष्मा दुकाने, इतर वैद्यकीय सेवा, त्यांची उत्पादन व वितरणातील घटक कार्यालये, लसींचे उत्पादन व वितरण, वैद्यकीय साधनसामग्री, उपकरणे, कच्च्या मालाचे घटक सुरू राहतील.

वाहतूक : विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा व सार्वजनिक सेवेतील बसेस, मालवाहतूक.

इतर : पाणीपुरवठा सेवा, एटीएम, विद्युत व गॅस सिलिंडर पुरवठा सेवा तसेच उस्मानाबाद शहरातील पोलीस पेट्रेालपंप. पालिका व नगरपंचायत हद्दीपासून १० किमी अंतरापुढील केवळ राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असणारी पेट्रोलपंप. उर्वरित पेट्रोलपंप बंद राहतील. तसेच इतर सर्व आस्थापनाही बंद ठेवाव्या लागणार आहेत.

Web Title: 5 day public curfew in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.