तुम्हाला बोअर होतंय ? पण मुळात बोअर होतंच का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:30 IST2020-03-28T16:27:17+5:302020-03-28T16:30:23+5:30
बोअर का होतं? ते पण एक शास्र असतं..समजून घ्या!

तुम्हाला बोअर होतंय ? पण मुळात बोअर होतंच का ?
बोअर होतंय, बोअर होतंय हे तुम्ही दिवसातून कितीवेळा म्हणता? आणि हेच म्हणून तुम्ही आपल्या आई-बाबांनाही किती बोअर करता? तुम्हाला माहिती आहे का की बोअर होतं म्हणजे नेमकं काय होतं ते? शरीरातील कोणत्या भागाला बोअर होतं आणि का?
या बोअर होण्यामागे असतो तो आपला मेंदू. मेंदू कंटाळला की आपल्याला बोअर व्हायला लागतं.
हा मेंदू कंटाळतो तरी का?
1. आपल्या मेंदूला सतत नवीन अनुभव घ्यायचे असतात. मेंदूत न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात. या न्यूरॉन्सला नवीन अनुभव आवडतात. हे नवीन अनुभव आले की या न्यूरॉन्सची जोडणी होते आणि आपण जे करत आहोत त्यात मजा वाटायला लागते.
2. आपण जेव्हा नवीन खेळ खेळतो तेव्हा केवढी धमाल येत असते कारण आपल्या मेंदूत या नवीन खेळामुळे न्यूरॉन्सची जोडणी होते; पण हाच खेळ जर परत परत खेळला आणि खेळातला नवेपणा संपला की मेंदूतले न्यूरॉन्सची जोडणी होत नाही.
3. न्यूरॉन्सला तोच तोचपणा नको असतो. नावीन्य हवं असतं. तुम्ही सतत नवीन करा असंच न्यूरॉन्सचं म्हणणं असतं. आणि आपण जर न्यूरॉन्सचं हे म्हणणं ऐकलं नाही की त्याला काहीच नवेपणाचं खाद्य मिळत नाही. मग ते एकमेकांशी जोडले जात नाही. त्यामुळे मग मेंदूला कंटाळा येतो.
4. आणि मेंदू कंटाळला की मग आपल्याला बोअर होतं.
आता लक्षात आलं का की बोअर होतं म्हणजे नेमकं काय होतं ते?