तुम्ही कधी कुणाला पत्र लिहिलंय का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 16:39 IST2020-04-08T16:18:23+5:302020-04-08T16:39:53+5:30
मला सुचली आहे एक भन्नाट आयडिया. तुम्हीही बघा करून !

तुम्ही कधी कुणाला पत्र लिहिलंय का ?
- अजिंक्य भोसले, सातारा
तुम्हाला काय वाटलं, आम्ही घरकोंबडे आहोत? काही काम नाही, धाम नाही, नुसत्याच चकाटय़ा आणि मोबाइल?
पण नाही. आमचा दिवस तर बुवा एकदम मज्जेत जातो.तुम्हाला माहितीये, मी तर आता व्यायामही करायला लागलोय रोज. येऊच दे, त्या कोरोनाला. कशी फाइट करतो बघा त्याच्याशी. तो दिसत नाही, लपूनछपून, गनिमी काव्यानं येतो म्हणून, पण समोरासमोर लढला असता ना, तर त्याला असं मच्छरासारखं चिरडलं असतं. ते जाऊ द्या; पण मी सध्या काय करतोय, माहितीय्ये?.
अरे, एक से एक आयडिया आहेत माङयाकडे. बसल्या बसल्या बोअरला फोर मारतो मी.
काय म्हणता? - सांगू तुम्हालाही.
नुकताच मी एक खेळ खेळला. मित्रबरोबर. तुम्ही म्हणाल, काय ढॉ मारतोय ! अख्खं जग घरात बसलंय आणि तू कुठे एवढा मोठा बाश्शा लागून गेला मित्राबरोबर खेळायला !
अरे, पण मी खरंच सांगतोय. आम्ही खेळलो. पण तो त्याच्या घरी होता आणि मी माङया घरी !.
जाऊ द्या, सांगूनच टाकतो तुम्हाला. अरे, मी पत्र लिहिलं माङया मित्रला. ते वाचून तो एवढा खूश झाला
आणि मग त्यानंही मला पत्र पाठवलं. एवढं भारी वाटलं ना, दोघांनाही.
तुम्ही पुन्हा म्हणाल, आता हा जरा जास्तीच ढॉ द्यायला लागला. घरात वर्तमानपत्र यायला मारामार आणि यांच्या घरात पत्रंही यायला लागली!.
अरे, ऐका तर खरी. अगोदर मी हातानं पत्र लिहिलं माझ्या जिगरी दोस्ताला. मी या पत्राचा आईच्या मोबाइलवरून फोटो काढला.
आईनं मग तिच्या व्हॉट्सअॅपवरून दिलं हे पत्र मित्राच्या आईला पाठवून ! त्यानंही मग मला तसंच पत्र पाठवलं. अशी आमची पत्रापत्री सुरू झाली. मी आणि माझा मित्र, दोघंही आता आमच्या इतर मित्रांना पत्र पाठवतोय, हातानं लिहून. तेही त्यांच्या मित्रांना पाठवताहेत. अर्धी ऑफलाइन आणि अर्धी ऑनलाइन अशी आमची पत्रापत्री सुरू आहे. फोनवर बोलण्यापेक्षा असं पत्र लिहिल्यावर आणि मित्राचं वाचल्यावर फार भारी
वाटतं! माझ्या आई-बाबांनीपण मग त्यांच्या लहानपणी, तरुणपणी मित्र-मैत्रिणींनी त्यांना लिहिलेली पत्र दाखवली. ती वाचताना त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं; पण ती पत्रं त्यांनी अजून जपून ठेवली आहेत, याचं मला फार आश्चर्य वाटलं. आपल्याला तर अशी पत्रं जपून ठेवायची काही गरज नाही, कारण आपण ती पत्रं सेव्ह करू शकतो. मोठे झालो, आठवण आली की वाचत जाऊ आपण ती पत्रं.
पण मला एक शंका आहे, ती पत्रं वाचताना आपणही मोठेपणी असं रडू का?. आई-बाबा म्हणतात, अरे, हे रडणं आनंदाचं आहे !
कसं ते काही मला कळलं नाही; पण आपण पाठवू पत्र एकमेकांना. नेहमी. बघा, काय भ्भारी वाटतं ते!.