घरातल्याच भिंतीवर फोटोंच्या माळा ! बघा कसलं भारी दिसेल..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:22 IST2020-05-14T18:16:46+5:302020-05-14T18:22:07+5:30
लटकत्या फोटोंची मज्जा

घरातल्याच भिंतीवर फोटोंच्या माळा ! बघा कसलं भारी दिसेल..
तुमच्या लहानपणीचे, ट्रिप्सचे, वाढदिवसाचे, शाळेतले काही फोटो असे असतात जे तुमचे फेवरीट असतात. ते सतत बघावे असंही तुम्हाला वाटत असतं पण कपाटात नाहीतर माळ्यावर ठेवलेले फोटो सारखे बघणार कसे? त्यावर उपाय आहे ना! लागा तर मग कामाला.
साहित्य:
तुमचे खास आवडीचे चार पाच फोटो, सुतळी, कार्डशीट किंवा कुठलाही जाड कागद, डिंक, रंग, पंचिंग मशीन किंवा कर्कटक
कृती:
1) तुमच्या फोटोच्या आकारापेक्षा एक इंचाने मोठा फोटोच्याच आकाराचा कागद कापून घ्या.
2) त्यावर फोटो तुम्हाला हवा तसे म्हणजे सरळ, किंचित कललेले चिकटवून घ्या.
3) फोटोच्या चारही बाजूंनी जी जागा आहे त्यात तुम्हाला काही डिझाईन काढायचं असेल तर काढा. रंगवा.
4) आता एक आई बाबांच्या हातभार लांब सुतळी घ्या. सुतळी नसेल तर कुठलाही जाड दोरा चालेल.
5) काही एका विशिष्ठ अंतरावर तुम्हाला फोटो लटकावयाचे आहेत. त्यासाठी फोटो फ्रेमच्या वरच्या बाजूला पंचिंग मशीन किंवा कर्कटक ने भोक पाडा. आणि साधा दोरा ओवा.
6) आणि पाचही फोटो सुतळीला कमी अधिक उंचीवर लटकवा.
7) दोन फोटोंच्या मधे तुम्ही तुमच्या जवळच्या इतर काही गोष्टीही लटकवू शकता. किंवा सुतळीला रंग देऊ शकता. कागदाचे आकार कापून चिकटवू शकता.
8) आता तुमच्या आठवणी, तुमचे लाडके फोटो नेहमी तुमच्या डोळ्यासमोर असतील.
----------------------------