coronavirus : हा कोरोना मरत का नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 15:14 IST2020-04-08T15:11:51+5:302020-04-08T15:14:30+5:30
श्वेताला प्रश्न पडला आहे, की अख्खं जग या कोरोनाच्या तावडीतून कधी सुटणार?

coronavirus : हा कोरोना मरत का नाही ?
- श्वेता देशमुख
तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, कोरोना हा काही नवा व्हायरस नाहीये. माणसाला या व्हायरसची माहिती 1960 सालापासून आहे. कोरोना व्हायरस हा शब्द लॅटिन शब्द कोरोनावरून घेतलेला आहे. कोरोनाचा लॅटिन अर्थ क्राउन किंवा मुकुट. या व्हायरसला सगळीकडे मुकुटाला असतात तशी टोकं असतात. हा व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरतो. सध्या ज्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे आणि तुम्हाला घरात अडकवून ठेवलं आहे तो व्हायरस या मूळ कोरोनाचंच नवं रूप आहे. म्हणून डब्ल्यूएचओने या नव्या स्वरूपातल्या कोरोनाला कोविड 19 म्हटलं आहे.
हा व्हायरस जाणार कधी?
कोरोना 1960 पासून माणसाला माहीत आहे. म्हणजे 1960 पूर्वीही तो होता आणि यानंतरही तो असेल. त्यामुळे या व्हायरसला पूर्णपणे नष्ट करता येऊ शकत नाही. पण शास्रज्ञ आणि या विषयातले तज्ज्ञ यावर लस शोधत आहेत. त्याच्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याची लास उपलब्ध होईल आणि त्यापासून माण्सांना आपलं संरक्षण करता येईल.
तोवर काय?
तोवर आपण स्वच्छता पाळायची. हात स्वच्छ साबणाने धुवायचे. जोवर आपण लॉकडाउनमध्ये आहोत तोवर बाहेर पडण्यासाठी हट्ट करायचा नाही.
बाहेर का पडायचं नाही? हा व्हायरस नुसता स्पर्शानेही पसरतो. त्यामुळे तो आपल्यार्पयत कसा आणि कुठून पोहोचेल सांगता येत नाही. दुसरं म्हणजे हा व्हायरस गुणाकाराच्या स्वरूपात पसरतो. त्यामुळे झटपट वाढतो. त्याच्या वाढण्याचे प्रमाण रोखायचं असेल तर माणसांनी एकमेकांच्या कमीत
कमी संपर्कात यायला हवं. त्याच्या वाढण्याची साखळीच आपल्याला तोडून टाकायची आहे. ती एकदा का तुटली की ह्या आजारावर आपण मात करू, हे युद्ध जिंकू आणि सगळ्यांना परत खेळायला बाहेर जाता येईल. त्यामुळे ही व्हायरसची साखळी तोडायला आईबाबांना, सरकारला तुम्ही छोटे दोस्तही नक्की मदत करा.