coronavirus : होम क्वॉरण्टाइन म्हणजे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 18:11 IST2020-03-28T18:07:08+5:302020-03-28T18:11:05+5:30
परदेशातून जे लोक येतात त्यांनाच का लांब राहायला सांगतात ?

coronavirus : होम क्वॉरण्टाइन म्हणजे काय ?
होम क्वॉरण्टाइन आणि सेल्फ क्वॉरण्टाइन असेल दोन शब्दही तुम्ही सतत ऐकत असाल. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आहेत; पण ज्यांची टेस्ट निगेटिव्ह आहे, म्हणजे कोरोनाच्या व्हायरसने शरीरात एंट्री केलेली आहे की नाही हे नक्की माहीत नाहीये अशा लोकांना होम क्वॉरण्टाइन केलं जातं. काहीवेळा लोकांना हॉस्पिटलमध्ये राहायचं नसतं मग त्यांनी घरीच थांबावं आणि जगाशी संपर्क बंद करावा असं सांगितलं जातं. म्हणजे मग व्हायरस पसरणार नाही.
होम क्वॉरण्टाइन कोण होतात?
जे लोक परदेशातून आले आहेत किंवा अशा देशातून जिथे खूप कोरोनाचे रुग्ण आहेत त्या लोकांनी स्वत:ला क्वॉरण्टाइन करायचं आहे. या काळात घराबाहेर पडायचं नाही. इतर माणसांना भेटायचं नाही. इतरांना स्वत:च्या वस्तू वापरू द्यायच्या नाहीत. इतर लोकांच्या जवळ जायचं नाही. कमीत कमी 3 फूट अंतर ठेवायचं. थोडक्यात स्वत:च्या खोलीत 14 दिवस बसून राहायचं. या काळात जर लक्षणं दिसायला लागली तर डॉक्टरांकडे जायचं. नाही दिसली तर काही काही प्रश्न नाही. आपल्याकडे अशा होम क्वॉरण्टाइन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारला जातोय. म्हणजे इतर लोकांनाही ते क्वॉरण्टाइन आहेत हे समजू शकेल.
घरातून बाहेर का पडायचं नाही?
बाकी उरलेले, जे परदेशातून आलेले नाहीत त्यांनीही शक्यतो सध्या घराबाहेर पडू नका असं सरकार सांगतंय. याचं कारण चुकूनही कुणाला संसर्ग होऊ नये आणि तो पसरू नये. त्यामुळे मोठेही घरात, छोटेही घरात. तुम्हीही घरातच थांबा. बिल्डिंग खाली खेळायला जायचंय म्हणून हट्ट करू नका. मित्र-मैत्रिणींना घरी बोलावू नका. फिरायला बागेत जाऊ नका. अशी कुठलीही जागा जिथे खूप माणसं आहेत ती टाळा. शाळा बंदच आहेत, तर तुम्ही जा सेल्फ क्वॉरण्टाइनमध्ये. आणि आई-बाबांची काळजी घ्या!काय म्हणता?