जगभरातल्या स्ट्रीट आर्टची माहिती हवी आहे मग हे वाचा! 42 शहरातल्या 140 स्ट्रीट आर्ट एकाच पुस्तकात!
By Admin | Updated: May 11, 2017 18:40 IST2017-05-11T18:40:07+5:302017-05-11T18:40:07+5:30
स्ट्रीट आर्ट प्रेमींना जगभरातल्या शहरांमधल्या स्ट्रीट आर्टची माहिती देण्यासाठी ‘लोनली प्लॅनेट’ या ट्रॅव्हल मॅगझनिनं स्ट्रीट आर्ट वर एक पुस्तकच प्रकाशित केलं आहे.

जगभरातल्या स्ट्रीट आर्टची माहिती हवी आहे मग हे वाचा! 42 शहरातल्या 140 स्ट्रीट आर्ट एकाच पुस्तकात!
-अमृता कदम
फिरायला जायचं म्हणजे केवळ मौजमजा नाही..,अनेकजण आपले छंद जोपासण्यासाठी, आपल्या अभ्यासाच्या निमित्तानेही पर्यटन करत असतात. त्यामागे त्यांचा उद्देश एखाद्या ठराविक ठिकाणावर किंवा तिथल्या वैशिष्ट्यांवरच भर देण्याचा असतो. म्हणजे काहीजण वन्यजीवांचे छायाचित्रण करण्यासाठी, काहीजण पक्षीनिरीक्षणासाठी तर कोणी ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासाठीही आवर्जून पर्यटन करतात.
दृश्य माध्यमांची आवड असलेले लोक जगभरात भरणाऱ्या विविध प्रदर्शनांना, महोत्सवांना हजेरी लावतात. दृश्य माध्यमांमधलाच एक प्रकार म्हणजे स्ट्रीट आर्ट. शहरांमधल्या रस्त्यालगतच्या मोठमोठ्या भिंतींचाच कॅनव्हास करून चित्रं काढली जातात. मान्यवर आर्टिस्टही आपल्या कुंचल्यातून या भिंतींना एक नवं रूप देतात.
केवळ स्ट्रीट आर्टचा आस्वाद घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी जगभर फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. या स्ट्रीट आर्ट प्रेमींना जगभरातल्या शहरांमधल्या स्ट्रीट आर्टची माहिती देण्यासाठी ‘लोनली प्लॅनेट’ या ट्रॅव्हल मॅगझनिनं स्ट्रीट आर्ट वर एक पुस्तकच प्रकाशित केलं आहे. या पुस्तकामध्ये 42 शहरांमधल्या स्ट्रीट आर्टसाठी प्रसिद्ध असलेल्या 140 स्थळांची माहिती दिली आहे. लंडनपासून मेलबर्न, मॉन्ट्रियाल, सॅन फ्रॅन्सिस्कोपर्यंतची शहर या यादीत सामील आहेत.