(Image Credit : Mediu)
उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील एका अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. खरं तर या ठिकाणाला भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणतः 18,000 फूट उंचावर वसलेलं असून या गावाचं नाव 'माणा' असं आहे.
भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. याच ठिकाणी सरस्वती आणि अलकनंदा नद्यांचा संगम होतो. याव्यतिरिक्त येथे अनेक प्राचीन मंदिरं आणि गुहाही आहेत. बद्रिनाथपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावातील सर्व रस्ते आधी कच्चे होते. त्यामुळे अनेक लोक येथे जाणं टाळत होते. परंतु, आता या गावात विकास करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी जात असतात.
जे पर्यटक बद्रिनाथ यात्रेला जातात. ते भारतातील शेवटचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणा या गावाला भेट नक्की देतात. या गावात फार थंडी असून जवळपास 6 महिने येथे बर्फवृष्टी होत असते. संपूर्ण गाव बर्फाखाली जातं. त्यामुळे येथे राहणारी लोक थंडी सुरू होण्याआधी जवळच असलेल्या चामोली जिल्ह्यामध्ये जातात. तसेच या गावामध्ये एकच इंटर कॉलेज आहे. जे सहा महिने माणामध्ये आणि सहा महिने चामोलीमध्ये सुरू असतं.
माणामध्ये एक चहाचं दुकान असून त्या दुकानाच्या पाटिवर लिहिलं आहे की, 'भारतातील शेवटचं चहाचं दुकान'. येथे फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती या दुकानाजवळ फोटो काढतात. या गावातून पुढे कोणतही ठिकाण नसून रस्ताही नाही. थोड्या अंतरावर भारतीय सैन्याचा कॅम्प आहे.
माणामध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती भीमपुलला फिरण्यासाठी नक्की जातात. असं म्हटलं जातं की, पांडव याच मार्गाने स्वर्गात गेले होते. असं सांगितलं जातं की, येथे दोन मोठे डोंगर असून मधोमध एक खाडी होती. त्यामुळे हे पार करणं फार अवघड होतं. भीमने येथे दोन मोठ्या शिळा टाकल्या आणि पूल तयार केला. आजही लोक स्वर्गात जाण्याचा रस्ता समजून येथे जात असतात.