(Image Credit : desertpearl.in)
हिवाळ्याला सुरूवात होताच फिरण्याची आवड असणारे लोक फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. हिवाळ्यात खासकरून अनेकांना ऑफबीट ठिकाणांवर फिरायला जाण्याची फार इच्छा असते. तुम्हीही हिवाळ्यात कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एका खास ठिकाणाची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही या हिवाळ्यात वेगळ्या अनुभवासाठी राजेशाही थाट-बाट असलेल्या ५०० वर्ष जुन्या किल्ल्याला भेट देऊ शकता. हा किल्ला आहे खिमसर.
खिमसर किल्ला जोधपूर आणि बीकानेरच्या मधे खिमसर नावाच्या एका गावात आहे. हा किल्ला राव करमसी यांनी १६व्या शतकात म्हणजेच ५०० वर्षांआधी तयार केला होता. त्यानंतर अनेकदा या किल्ल्याचा विस्तार करण्याता आला. याला वेगवेगळी राजकीय कारणे होती. खिमसर किल्ल्याचं सौंदर्य पर्यटकांना चांगलंच आकर्षित करतं. येथील अद्भूत वास्तुकला आणि भव्यतेमुळे हा किल्ला राजस्थानातील सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक गणला जातो.
आज या किल्ल्यात हेरिटेज हॉटेल चालवलं जातं. तर किल्ल्याच्या एका भागात आजही राजघराण्यातील लोक राहतात. हे हॉटेल राजघराण्यातील लोकांकडूनच चालवलं जातं. खिमसर किल्ल्याला भेट देण्याचा सर्वात चांगला कालावधी हिवाळा मानला जातो. इथे ऑक्टोबर ते मार्चमध्ये भेट दिल्यास तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल.
किल्ल्याची खासियत
- हा किल्ला त्याच्या वास्तुकलेसाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. याची भव्यता पाहून त्या काळातील शाही थाट काय असेल हे समजून घेता येतं.
- या किल्ल्याच्या एन्ट्रीलाच तुम्हाला हिरव्यागार बागा आणि वेगवेगळे प्राणी-पक्षी बघायला मिळतील.
- किल्ल्याच्या आत जाणाऱ्या मार्गातही अनेक स्तंभ, खांब, नक्षीकाम केलेल्या मूर्ती बघायला मिळतात. तसेच या किल्ल्याची ठेवण फारच शानदार आणि आकर्षक आहे.
- या किल्ल्याच्या आजूबाजूला अनेक प्रसिद्ध आणि सुंदर किल्ले आहेत. यात मेहरानगढ किल्ला, उम्मेद भवन पॅलेस इथेही तुम्ही भेट देऊ शकता.
- जर तुम्हाला खिमसर किल्ला बघायचा असेल तर ऑक्टोबर ते मार्च हा सर्वात बेस्ट कालावधी आहे.