Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
By हर्षदा भिरवंडेकर | Updated: November 3, 2025 19:02 IST2025-11-03T18:58:52+5:302025-11-03T19:02:19+5:30
Thailand Budget Trip : शिमला-मनाली किंवा काश्मीर ट्रीपसाठी जितके बजेट लागते, तितक्याच बजेटमध्ये हा देश फिरता येतो. जर तुम्ही पहिल्यांदाच परदेशी जाण्याची योजना आखत असाल, तर हा देश उत्तम पर्याय आहे.

Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
परदेशवारी करणं अनेकांसाठी एक स्वप्न असतं. अनेकदा आपल्याला वाटतं की, परदेशात फिरायला जायचं असेल तर किमान १.५ ते २ लाख रुपये आपल्या खिशात असायला हवेत. पण, खरंच परदेशात फिरण्यासाठी एवढा खर्च येतो का? तर नाही. भारतापासून अवघ्या चार ते साडेचार तास दूर असलेल्या एका देशांत तुम्ही अवघ्या ५० हजारांत देखील फिरून येऊ शकता. हा देश आहे 'थायलंड'. शिमला-मनाली किंवा काश्मीर ट्रीपसाठी जितके बजेट लागते, तितक्याच बजेटमध्ये हा देश फिरता येतो. जर तुम्ही पहिल्यांदाच परदेशी जाण्याची योजना आखत असाल, तर थायलंड हा उत्तम पर्याय आहे.
थायलंडमध्ये काय आहे खास?
थायलंड म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे तिथली नाईट लाईफ. अर्थात जगभरातील अनेक लोक नाईट लाईफ अनुभवण्यासाठी थायलंडल येतात हे खरं आहे. पण, या सोबतच इथे सुंदर समुद्र किनारे, फी फी, कोरल, फुकेत आयलंड तिथली पांढरी वाळू अन् पाण्याखालचे विश्व उघड्या डोळ्यांनी पाहता येईल इतका स्वच्छ निळाशार समुद्र देखील अनुभवलाच पाहिजे. धमाल-मस्ती आणि मनोरंजनासोबतच इथली मंदिरं ही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. जगातील सगळ्यात उंच गणपती मूर्ती असणारे मंदिर, सोन्याची भगवान बुद्धांची मूर्ती ते पांढऱ्या, जांभळ्या अन् सोनेरी रंगातील मंदिरे बघायलाच हवीत.
थायलंड आणखी कशासाठी प्रसिद्ध असेल तर, ते तिथल्या वेगवेगळ्या जंगल सफारी आणि अॅनिमल पार्कसाठी. इथल्या सफारी वर्ल्डमध्ये तुम्ही ओरांग-उटान माकडच्या भन्नाट शोपासून, डॉल्फिन्सची कर्तबगारी आणि हत्ती चित्र काढतानाही बघू शकता. प्राण्यांना खाऊ घालून त्यांच्यासोबत फोटोही काढू शकता. याच देशाच्या बँकॉक शहरात टायगर पार्क आहे. इथे तुम्हाला चक्क वाघाला हात लावण्याची संधी मिळते. शिवाय अजस्त्र वाघासोबात फोटोही काढता येतात.
शॉपिंग प्रेमींसाठी तर हा देश फिरणं म्हणजे पर्वणीच! इथले वेगवेगळे मार्केट्स जगभरात प्रसिद्ध आहेत. फ्लोटिंग मार्केट, चाटूचाक मार्केट, इंद्रा शॉपिंग सेंटरपासून ते एमबीके मॉल, टर्मिनल २१ आणि फॅशन आयलंड असे मोठमोठे पण खिशाला परवडणारे शॉपिंग हब्स आहेत.
किती खर्च येतो?
जर तुम्ही ५ दिवसांची थायलंड ट्रीप प्लॅन करत असाल, तर ५०००० रुपये पुरेसे आहेत. हा देश भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे. मात्र, या देशात जाताना नियमांनुसार सोबत १० हजार थाई बाथ म्हणजेच साधारण ३० हजार भारतीय रुपये घेऊन जावे लागतात. याच १० हजार बाथमध्ये तुमची उरलेली ट्रीप पूर्ण होऊ शकते.
विमानाच्या तिकीटांसाठी साधारण १८ हजार रुपये खर्च येतो. स्वस्त तिकीटांसाठी थायलंडचे 'डॉन म्युयोंग' विमानतळ निवडावे. तिथे गेलात की, थायलंडची मेट्रो अवघ्या ५० रुपयांमध्ये सगळी शहरं फिरवते. शिवाय २०० ते ४०० रुपयांत इथे टॅक्सी बुक करता येते. यासाठी ग्रॅब किंवा बोल्ट हे अॅप वापरता येतात. संपूर्ण थायलंडमध्ये भरपूर भारतीय हॉटेल्स असल्याने जेवणाचीही फार चिंता करावी लागत नाही. २०० बाथ अर्थात ६०० भारतीय रुपयांत अनलिमिटेड जेवण मिळते. दिवसाकाठी ४००० रुपये खर्च करून या देशात आरामात राहू, फिरू आणि खाऊ शकता. सगळीकडे फुकट वायफाय असल्याने इंटरनेट देखील भरपूर वापरता येते.