उन्हाळ्यात गारेगार अनुभवासाठी जर तुम्ही एखाद्या नॅशनल पार्कमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सिमलिपाल नॅशनल पार्क परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. इथे तुम्ही हिरव्यागार झाडांसोबतच वेगवेगळ्या प्राण्यांना बघण्याचाही आनंद घेऊ शकता. तसेच बंगाल टायगर आणि हत्तीही बघू शकता.
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील सिमलिपाल नॅशनल पार्कला हे नाव आजूबाजूला पसरलेल्या सेमल आणि लाल कापसांच्या झाडांमुळे देण्यात आलं आहे. या ठिकाणाच्या सौंदर्यात भर टाकण्याचं काम करतात येथील जोरांडा आणि बरेहीपानी वॉटरफॉल. निसर्गाच्या कुशीत वसलेलं सिमलिपाल हे ठिकाण कॅंपिंग आणि ट्रेकिंगसाठीही परफेक्ट मानलं जातं.
नॅशनल पार्कची खासियत
सिमलिपाल नॅशनल पार्कमध्ये अनेक दुर्मिळ पक्षी-प्राणी बघायला मिळतात. तसेच वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पतीही इथे आढळतात. इथे तुम्हाला २३० प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. तसेच इथे वेगवेगळ्या प्रजातीचे साप आणि कासव सुद्धा बघायला मिळतात. इतकेच नाही तर इथे १०७६ प्रजातींच्या वनस्पही बघायला मिळतात. तसेच इथे ९६ प्रकारचे ऑर्किडही आहेत. या नॅशनल पार्कमध्ये तुम्ही जीप सफारीचाही आनंद घेऊ शकता. यातून तुम्ही जंगलभर फिरून वेगवेगळ्या प्राणी-पक्ष्यांना जवळून बघू शकता.
कसे पोहोचाल?
भुवनेश्वर आणि कोलकाता हे सिमलिपाल येथून जवळचे एअरपोर्ट आहेत. तसे लोक कोलकत्याहून इथे ड्राइव्ह करत जाण्याला प्राधान्य देतात. ज्यात कोणताही धावपळ नाहीये. तसेच येथील जवळील रेल्वे स्टेशन बारीपादा हे आहे. हे ६० किमी दूर अंतरावर आहे. बारीपादाहून नॅशनल पार्कला पोहोचण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे.