(Image Credit : thrillophilia.com)
जर तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि एखाद्या ऑफबीट डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. येथे अनेक फेमस टूरिस्ट स्पॉट्स आहेत. परंतु, जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर यासाठी या राज्यातील खजियारला तुम्ही भेट देऊ शकता.
तुम्हाला देशातच विदेशी पर्यटन स्थळांची सफर अनुभवायची असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशमधील 'खजियार'ला भेट देऊ शकता. कारण खजियारला 'मिनी स्वित्झर्लन्ड' म्हणून ओळखलं जातं. जगभरातील 160 'मिनी स्वित्झर्लन्ड' पैकी एक असलेलं खजियार आपल्या अलौकीक निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातं.
खजियार तलाव हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यामध्ये सुमद्र सपाटीपासून 1,920 मीटर उंचावर आहे. याच्या चारही बाजूंना असलेल्या देवनार वृक्षांची तलावाच्या निळ्याशार पाण्यामध्ये अत्यंत सुंदर प्रतिमा उमटते. ते दृश्य अप्रतिम दिसतं. येथील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, तलावामध्ये तरंगणारा गवताचा गुच्छ. निळ्याशार पाण्यामध्ये तरंगणारा हा गुच्छ पाहायला फार सुंदर दिसतो. खजियारमद्ये गेल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य पाहून तुम्हाला खरचं स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचा आनंद होईल.
'मिनी स्वित्झर्लन्ड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खजियारमध्ये तुम्ही अॅडव्हेचरही करू शकता. येथे तुम्ही पॅराग्लायडिंगपासून ते हॉर्स रायडिंगपर्यंत अनेक वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी करू शकता. एवढचं नव्हेतर खजियारमध्ये तुम्ही ट्रेकिंगचाही अनुभव घेऊ शकता. खजियार तलावाच्या किनाऱ्यावर एक नागदेवताचं मंदिरही आहे. खजियारमध्ये राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. येथे तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.
कसे पोहोचाल? खजियार चंबा किंवा डलहौसीपासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. खजियारला पोहोचण्यासाठी तुम्ही शिमलापर्यंत रेल्वे मार्गाने किंवा फ्लाइटने जाऊ शकता. यानंतर तुम्हाला बस किंवा टॅक्सी घेऊन खजियारपर्यंत पोहोचता येईल. याव्यतिरिक्त खजियारसोबतच हिमाचल प्रदेशातील इतरही अनेक निसर्गसौंदर्याचा खजाना असलेल्या ठिकाणांना भेट देऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही हिमाचल प्रदेशात जाणार असाल तर खजियारला नक्की भेट द्या.