मालदीवला जाणार असाल तर नेहेमीपेक्षा वेगळं पाहा. गॅन, हिथादू, माराधू आणि मीधू या चार बेटांवर न चुकता जा!
By Admin | Updated: June 30, 2017 17:32 IST2017-06-30T17:32:57+5:302017-06-30T17:32:57+5:30
जर तुम्हाला निवांतपणे मालदीवच्या सागरी सौंदर्याची अनुभूती आणि आस्वाद घ्यायचा असेल तर इथल्या थोड्याशा अनएक्सप्लोअर्ड बेटांनाही भेट द्या.

मालदीवला जाणार असाल तर नेहेमीपेक्षा वेगळं पाहा. गॅन, हिथादू, माराधू आणि मीधू या चार बेटांवर न चुकता जा!
- अमृता कदम
विमानातून खाली पाहिल्यावर निळ्याशार समुद्रात हिरव्याजर्द ठिपक्यांची माळ दिसली की समजावं मालदीव आलं. प्रवाळ बेटांनी बनलेला मालदीव हा देश गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय पर्यटकांची पसंती बनला आहे. बऱ्याचदा मालदीवला भेट देणारे पर्यटक हे राजधानी माले आणि आसपासच्या बेटांना भेट देऊन परत येतात. पण जर तुम्हाला निवांतपणे मालदीवच्या सागरी सौंदर्याची अनुभूती आणि आस्वाद घ्यायचा असेल तर इथल्या थोड्याशा अनएक्सप्लोअर्ड बेटांनाही भेट द्या.
* मालदीवमधल्या या छोट्या बेटांवर तुम्हाला तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येतो. नारळाचा वापर करु न बनवलेला ट्युना मासा लाजबाब! त्याचबरोबर वाहू, पॅरट फिशसारखं सी-फूड शिवाय पपई, केळी, नारळ वापरून बनवलेले गोडधोड पदार्थ तुम्हाला अगदी तृप्त करतात. आणि हे सगळं जर एखाद्या मालदीवन व्यक्तीच्या घरी मिळालं तर सोने पे सुहागा! एवढी भटकंती आणि पोटपूजा झाल्यानंतर जरा समुद्रात डुबकी मारून निळ्या समुद्रातली रंगीबेरंगी जीवसृष्टी पाहा. अंडरवॉटर डायव्हिंग करून तुम्ही खास इथेच आढळणारे सागरी जीव पाहू शकता. अगदीच खोलात शिरायचं नसेल तर बोटीतून दिसणारे डॉल्फिनही तुम्हाला आनंद द्यायला पुरेसे आहेत. जर मालदीवची सफर करायचं ठरवत असाल तर टूरिस्ट मॅन्युअलमध्ये दिलेली तीच तीच ठिकाणं पाहण्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहण्याचा प्रयत्न नक्की करा.