मालमत्ताकर तुम्हीच वाढवला ना? - राणे
By Admin | Updated: January 26, 2017 03:12 IST2017-01-26T03:12:29+5:302017-01-26T03:12:29+5:30
शिवसेना आणि भाजपाने २२ वर्षांत एकही वैशिष्ट्यपूर्ण काम केले नाही. तसेच शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात मालमत्ताकर कमी करू,

मालमत्ताकर तुम्हीच वाढवला ना? - राणे
ठाणे : शिवसेना आणि भाजपाने २२ वर्षांत एकही वैशिष्ट्यपूर्ण काम केले नाही. तसेच शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात मालमत्ताकर कमी करू, असे आश्वासन दिले असतानाही तो कोणी वाढवला, असा सवाल करून तो तुम्हीच वाढवला ना, असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला केला आहे.
सत्तांतर झाल्याशिवाय मुंबईत दर्जेदार नागरी सुविधा मिळणार नाहीत. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर मुंबई जागतिक कीर्तीचे शहर बनवू, असे प्रतिपादन त्यांनी ठाण्यात केले. या वेळी शिवसेना आणि भाजपा सत्ता जावी आणि आघाडीची सत्ता यावी, अशी काँग्रेसची रणनीती असून ‘फसवणूक म्हणजे भाजपा’ हे आमचे घोषवाक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या भाजपाच्या कार्यालयात भरतीचा बोर्ड लावला आहे. तेथे भरती चालू आहे. कोणत्याही प्रकारच्या माणसांना तेथे प्राधान्य दिले जात आहे. जाणारी व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थ, पद आणि पैशांसाठी जात आहे. बाहेरचे लोक भाजपात एवढे येत आहेत, त्यामुळे मुळात त्यांच्याकडे होते तरी काय, असा सवाल त्यांनी केला. स्वत:चे काही नसल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या, स्वभावाच्या, चारित्र्य नसलेल्या माणसांना भाजपात प्रवेश मिळतो आहे. त्यांची ध्येयधोरणे ही जनहिताची नसून राजकारणात स्वार्थ साधणारी आहेत. हे लोकांना आता कळून चुकले आहे. या सर्व कृतीमुळे भाजपाची प्रतिमा मलिन झाल्याचेही ते म्हणाले.
सेना आणि भाजपाकडून मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांत २२ वर्षांत काय योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये एकतरी वैशिष्टपूर्ण आहे का, असा प्रश्न करून जाहीरनामा व वचननाम्यात काही नसल्याचे सांगताना मुंबईत दुर्गंधी, रोगराई भयंकर वाढली आहे. या २२ वर्षांत शिवसेनेने मुंबई बकाल केली आहे. त्यामुळे सत्तांतर झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.