यंदाही डाळभात, खिचडी

By Admin | Updated: June 6, 2016 01:25 IST2016-06-06T01:25:30+5:302016-06-06T01:25:30+5:30

ठाणे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा टॅबसारख्या सुविधा मिळणार असल्या तरी माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत त्यांना यंदा डाळभात आणि खिचडी यापलीकडे नवे असे काहीच मिळणार

This year, delicacies, Khichdi | यंदाही डाळभात, खिचडी

यंदाही डाळभात, खिचडी

अजित मांडके,  ठाणे
ठाणे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा टॅबसारख्या सुविधा मिळणार असल्या तरी माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत त्यांना यंदा डाळभात आणि खिचडी यापलीकडे नवे असे काहीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेच्या शाळांमधून यंदाही हेच भोजन दिले जाणार आहे.
ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये यंदा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हाती टॅब पडणार असून विविध स्वरूपांच्या नव्या योजना सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी लाखोंच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या हाती यंदा वेळेतच शैक्षणिक सुविधा पडणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना खाण्यासाठी खिचडी दिली जात आहे. यंदाही त्याच धर्तीवर खिचडी आणि डाळभात दिला जाणार आहे. आठवड्याचे संपूर्ण नियोजन करण्यात येऊन कोणत्या वाराला काय दिले जाणार आहे, याचा तक्ता तयार केला आहे. एक दिवस खिचडी, तर एक दिवस डाळ तसेच इतर वेळेत चिक्कीही दिली जात आहे.
ठाणे महापालिकेच्या १३१ शाळा असून यामध्ये सुमारे ३२ हजार ६३६ विद्यार्थी आजघडीला शिक्षण घेत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात हा आकडा ३४ हजारांच्या आसपास जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीत किडे आढळल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यामुळे पालिकेने ठेकेदाराकडील ठेका रद्द करून आता हा ठेका महिला बचत गटांना दिला जात आहे.
सध्या महापालिका शाळांना शासनाकडून माध्यान्ह भोजनाचे साहित्य पुरवले जात असून या साहित्यातून महिला बचत गट एक दिवस खिचडी, एक दिवस वरणभात आणि एक दिवस आमटीभात असे बनवून विद्यार्थ्यांना देत आहेत. परंतु, काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हाती थेट तांदूळ, डाळ, कांदा, मीठ, तिखट असा महिनाभराचा किराणा देण्याचा प्रकारही गेल्या वर्षी समोर आला.

आठवड्याचा तपशील
सोमवार - वरणभात
मंगळवार - आमटीभात,
बुधवार - खिचडी,
गुरुवार - वरणभात,
शुक्रवार - आमटीभात,
शनिवार - खिचडी आणि बिस्किटे किंवा चुरमुरे अथवा इतर काही.
महापालिका शाळांची संख्या - १३१
विद्यार्थ्यांची संख्या - ३२ हजार ६३६
मराठी माध्यम शाळा - ८९ -
विद्यार्थी १९ हजार ३१०
हिंदी माध्यम शाळा - ०९
- विद्यार्थी २ हजार ८७१
उर्दू माध्यम शाळा - २३
- विद्यार्थी ८ हजार ६१०
गुजराती माध्यम शाळा - ०५
- विद्यार्थी २८५
इंग्रजी माध्यम शाळा - ०५
- विद्यार्थी १५६४

Web Title: This year, delicacies, Khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.