एम.ए.च्या विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका

By Admin | Updated: April 19, 2017 00:22 IST2017-04-19T00:22:10+5:302017-04-19T00:22:10+5:30

कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात एम.ए च्या परीक्षेचे केंद्र असून या केंद्रात विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप केले

Wrong question paper for MA students | एम.ए.च्या विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका

एम.ए.च्या विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका

कल्याण/अंबरनाथ : कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात एम.ए च्या परीक्षेचे केंद्र असून या केंद्रात विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप केले. मुंबई विद्यापीठाकडून झालेल्या चुकीचा भुर्दंड मात्र या केंद्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. ज्या विषयाची परीक्षा होती त्या विषया ऐवजी दोन दिवसानंतर जो पेपर होणार होता त्याचीच प्रश्नपत्रिका या विद्यार्थांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी ही बाब शिक्षकांच्या लक्षात आणल्यावर केंद्रात एकच धावाधाव सुरु झाली. अखेर दीड तासानंतर पुन्हा योग्य ती प्रश्नपत्रिका देण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या सध्या एम.ए.च्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेचे केंद्र बिर्ला महाविद्यालयात आहे. १७ एप्रिलला एम. ए.चा मराठी वाङ्मयाचा इतिहास या विषयाचा पेपर होता. दुपारी तीन वाजता हातात पडलेली प्र्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थी गोंधळात पडले. काही विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका चुकीची असल्याचे सांगितले तर एका विद्याथिर्नीने हा पेपर १९ एप्रिलला होणाऱ्या भाषाशास्त्र या विषयाचा असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.
चुकीची प्रश्नपत्रिका विद्यापीठाने पाठविल्याने महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात गोंधळ झाला. अखेर शिक्षकांनी चुकीच्या प्रश्नपत्रिका गोळा करुन ही चूक विद्यापीठाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर विद्यापीठाकडून पुन्हा योग्य विषयाची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. मात्र प्रश्नपत्रिकेचे वाटप होईपर्यंत साडेचार झाले होते. हा पेपर दोन तासांचा असल्याने या विद्यार्थ्यांना साडेसहा पर्यंत पेपर लिहिण्याची मुभा मिळणे गरजेचे होते. मात्र साडेपाच वाजता या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रातून दुसऱ्या ठिकाणी हलविले. त्यानंतर सुपरव्हीजनसाठी शिक्षक नसल्याचे कारण पुढे करत या विद्यार्थ्यांना स्टाफ रुममध्ये पेपर लिहिण्यासाठी बसविले. दोन ठिकाणी विद्यार्थ्यांना हलवल्याने त्या विद्यार्थ्यांची १५ ते २० मिनिटे वाया गेली. शिक्षकांनी हा वेळ त्यांना न दिल्याने वेळेचे नियोजन चुकल्याने विद्यार्थ्यांना अर्र्धवट पेपर देण्याची वेळ आली. चूक विद्यापीठाची असतानाही त्याचा त्रास मात्र आम्हाला झाला. आम्हाला पेपर लिहिण्यासाठी वेळ कमी पडला असा आरोप विद्यार्थीनी पूजा कांबळे हिने केला. (प्रतिनिधी)

Web Title: Wrong question paper for MA students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.