कामगार रुग्णालय पालिकेने चालवावे
By Admin | Updated: June 29, 2017 02:50 IST2017-06-29T02:50:58+5:302017-06-29T02:50:58+5:30
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्याचा तात्पुरता कारभार वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कामगार रुग्णालय पालिकेने चालवावे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्याचा तात्पुरता कारभार वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, सिव्हिलपेक्षाही कामगार रुग्णालयाची अवस्था दयनीय असल्याने येथे रुग्णांना कितपत चांगले उपचार मिळतील, हे सांगणे कठीण आहे. यामुळे हे रुग्णालय महापालिकेने चालवावे आणि त्यास ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, अशी मागणी आता स्वराज्य इंडियाने केली आहे.
कित्येक वर्षे जुन्या असलेल्या कामगार रुग्णालयात सुमारे ५०० च्या आसपास खाटा आहेत. परंतु, त्याची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. रुग्णांना उपचार वेळेवर मिळण्यापासून त्याची डागडुजी करण्यापर्यंतचे विषय ऐरणीवर आहेत. असे असताना आता जिल्हा शासकीय रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने त्याचा कारभार काही महिने कामगार रुग्णालयातून हाकला जाणार आहे. त्यानुसार, त्याची पाहणीदेखील आरोग्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केली असून डागडुजी करूनच सिव्हिल रुग्णालयाचा कारभार येथे हलवण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
परंतु, या रुग्णालयाची झालेली अवस्था पाहता, त्या ठिकाणी उपचार कितपत योग्य मिळू शकतात, याबाबत साशंकता आहे. त्यात हे रुग्णालय कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा मिळेल, या उद्देशाने बांधण्यात आले होते. परंतु, हे हॉस्पिटल ज्या कामगार राज्य विमा योजनेचा भाग होते, तेच आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शहराची लोकसंख्या आज झपाट्याने वाढत आहे. त्यातही असंघटित व असुरक्षित महिला व पुरुष कामगारांची, छोटे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. त्यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सिव्हिल रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अपुरे पडत आहे. त्यामुळे कामगार रुग्णालयाला नवा साज देण्याची गरज असून ते पालिकेने चालवण्यासाठी घ्यावे, अशी स्वराज्य इंडियाची मागणी आहे.