महानगर गॅस पाइपलाइनचे काम हुकूमशाही पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:02 IST2021-02-25T23:02:26+5:302021-02-25T23:02:31+5:30
गेले अनेक महिने खालापूरवरून कर्जत रस्त्यालगत महानगर गॅस पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महानगर गॅस पाइपलाइनचे काम हुकूमशाही पद्धतीने
कर्जत : गेले अनेक महिने खालापूरवरून कर्जत रस्त्यालगत महानगर गॅस पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एमएसआरडीसीने यामध्ये कोणत्याही प्रकारे शेतकरी व जागामालकांना पूर्वसूचना न देता हुकूमशाही पद्धतीने काम करीत असल्याची टीका माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून आता गॅस पाइपलाइनची चौकशी झाली पाहिजे आणि शेतकरीवर्गांना न्याय मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका माजी आमदार लाड यांनी घेतली आहे.
माजी आमदार सुरेश लाड यांनी गॅस लाईनच्या ठिकाणी जावून पंछि गुप्ता, ताटीपल्ली मोहनराज, बाळकृष्ण ठोंबरे, प्रकाश हजारे, अमोघ कुलकर्णी आदी शेतकऱ्यांशी संवाद साधून एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीने मालकीची जागा नसतानाही कोणत्या अनुषंगाने गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच या रस्त्याकरिता जमीन संपादन करणे गरजेचे होते ते केले नाही.
अगोदर रस्ता एमएमआरडीएने केला होता. त्याअगोदर १९८५ साली सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. त्यावेळीही भूसंपादन झाले नाही आणि आता राष्ट्रीय हायवे म्हणून शहापूर-मुरबाड कर्जतवरून खोपोलीकडे जाणाऱ्या मार्गासाठी भूसंपादन केले नाही. शेतकऱ्यांनी रस्त्येच्या कडेला जमिनी ठेवल्या. कर्जबाजारी होऊन व्याज भरून ते फेडले एवढे होऊनही जमिनी टिकविल्या. कारण वेळप्रसंगी त्या जमिनीवर उद्योग व्यवसाय सुरू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल.
मात्र, गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी परवानगी दिली, पण त्यावर किती मीटर लांब बांधकाम करावे लागेल याची कल्पना, सूचना दिली नाही. एकूणच मनमानी कारभार सुरू आहे. हे रोखले पाहिजे यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि एमएसआरडीचे मोपलवार यांना अर्ज देऊन काम थांबविले असल्याचे सांगितले.