गुप्तधनाचे आमिष दाखवून महिलेला लुटले
By Admin | Updated: May 13, 2017 00:47 IST2017-05-13T00:47:14+5:302017-05-13T00:47:14+5:30
येथील एका महिलेला तिच्या घरातच गुप्तधन असल्याचे अमिष दाखवून किशन हनुमान प्रसाद उर्फ सोनी (२६) या भोंदूबाबाने तिला तब्बल आठ लाखांना ठगविल्याची घटना नुकतीच घडली.

गुप्तधनाचे आमिष दाखवून महिलेला लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : येथील एका महिलेला तिच्या घरातच गुप्तधन असल्याचे अमिष दाखवून किशन हनुमान प्रसाद उर्फ सोनी (२६) या भोंदूबाबाने तिला तब्बल आठ लाखांना ठगविल्याची घटना नुकतीच घडली.
मीरा रोडच्या नयानगर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय महिलेची नूर अहमद या व्यक्तीशी ओळख झाली. नूर हा त्या महिलेच्या आईचा शेजारी असून त्याने त्या महिलेची किशन या तांत्रिकाशी काही दिवसांपूर्वी ओळख करुन दिली.
तांत्रिकाने त्या महिलेला, तीच्या घरात गुप्तधन असल्याचे सांगितले. तीने बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्यावर विश्वास बसल्याचे कळताच तांत्रिकाने तिला गुप्तधन मिळविण्यासाठी पूजाअर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तांत्रिकाने आपल्या चार साथीदारासह त्या महिलेला फसविण्यास सुरुवात केली. त्याने विविध पूजेसाठी तिच्याकडून तब्बल ८ लाख ६ हजार उकळले.
गुप्तधन मिळत नसल्याचे पाहून तीने आपली रक्कम परत देण्याचा तगादा तांत्रिकाकडे लावला. आपले बिंग फुटण्याची शक्यता निर्माण होताच किशन आपल्या साथीदारांसह तो उत्तर प्रदेशामध्ये पळून गेला. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने नयानगर पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.