महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रायोजकाविनाच
By Admin | Updated: August 13, 2015 23:17 IST2015-08-13T23:17:37+5:302015-08-13T23:17:37+5:30
दोन वेळा निविदेला मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर यंदाची २६ वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रायोजकाविनाच घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रायोजकाविनाच
ठाणे : दोन वेळा निविदेला मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर यंदाची २६ वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रायोजकाविनाच घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, येत्या २३ आॅगस्ट रोजी ही स्पर्धा महापालिका मुख्यालयापासून सुरू होणार असून मुख्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पुरुष आणि महिला गटांसाठी यंदा प्रथमच टाइम टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.
तसेच २१, १५ आणि १० किमीची स्पर्धाही यंदा प्रथमच सकाळी ६.३० वाजता सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही स्पर्धा निर्धाराने धावू या... ठाणे स्वच्छ व हिरवेगार करू या... या घोषवाक्याखाली आयोजित केली असून त्यात ३५ हजार स्पर्धक धावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या २३ आॅगस्ट रोजी सकाळी मुख्य स्पर्धा ६.३० वाजता सुरू होणार असून उर्वरित ७ गटांच्या स्पर्धा ८ वाजता सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस समारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आॅनलाइन सर्टिफिकेट देणार असून शेवटपर्यंत धावणाऱ्या स्पर्धकाला मेडल मिळणार आहे.