केडीएमसी हद्दीत काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ८३.३८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST2021-04-19T04:37:34+5:302021-04-19T04:37:34+5:30
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत एप्रिलमध्ये नव्याने आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी कोरोनाच्या ...

केडीएमसी हद्दीत काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ८३.३८ टक्के
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत एप्रिलमध्ये नव्याने आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी कोरोनाच्या आजारातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. शनिवारपर्यंत आढावा घेता १७ दिवसांत १७ हजार ८९७ रुग्ण बरे होऊन रुग्णालयांतून घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता सध्या ८३.३८ टक्के, तर मृत्यूदर हा १.२६ टक्का इतका आहे.
वर्षभरातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेता शनिवापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत १ लाख ४ हजार ५५८ रुग्ण आढळले आहेत. १ हजार ३१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७ हजार १८२ इतकी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडवला आहे. मार्चपासून रुग्णसंख्येत वाढ व्हायला सुरुवात झालेल्या केडीएमसीच्या हद्दीत सध्या दररोज आढळणारे रुग्ण दीड ते दोन हजारांच्या आसपास आहेत. ११ एप्रिलला तर तब्बल दाेन हजार ४०५ रुग्ण आढळले होते. ही आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. मार्चमध्ये १४ हजार ५८९ रुग्ण आढळले होते, तसेच ४९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर आठ हजार ९८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाने कहर केला असून, शनिवारपर्यंत १७ दिवसांत तब्बल २५ हजार ३८५ रुग्ण आढळले आहेत, तर ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी चिंतेत भर टाकणारी असली तरी कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या सध्या दीड हजाराच्या आसपास पोहोचली आहे. शनिवारी १,३९४ नव्या रुग्णांची भर पडली. बरे झालेल्यांचा आकडा हा १ हजार ७२२ होता. १२ एप्रिलपासून हा आकडा हजाराहून अधिक असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
--------------------------------------------------
वेळीच उपचार घ्यावेत
कोरोनाची लक्षणे आढळताच त्वरित चाचणी करून वेळेवर उपचार घेतले, तर रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे उपचार घ्यायला उशीर करू नका, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
--------------------------------------------------