विकास करताना नागरिकांचे हित जपणार की नाही?; १२ हजार रहिवाशांना धूळीचा त्रास

By अजित मांडके | Updated: April 21, 2025 06:48 IST2025-04-21T06:47:47+5:302025-04-21T06:48:22+5:30

ज्या ठिकाणापासून या भुयारी मार्गाचे काम सुरू झाले त्या ठिकाणी यापूर्वी असलेली हिरवळ नष्ट झाली. येथील हिरवळीमुळेच अनेक रहिवाशांनी फ्लॅट घेतले.

Will the interests of citizens be protected while developing?; 12,000 residents suffer from dust in Thane -Borivali Road Work | विकास करताना नागरिकांचे हित जपणार की नाही?; १२ हजार रहिवाशांना धूळीचा त्रास

विकास करताना नागरिकांचे हित जपणार की नाही?; १२ हजार रहिवाशांना धूळीचा त्रास

अजित मांडके

ठाणे आणि बोरिवलीमधील प्रवासाचे अंतर अवघ्या १२ मिनिटांवर आणण्यासाठी भुयारी मार्ग प्रकल्पाचे काम सुरू झाले. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर येथील १२ हजार रहिवाशांना धूळ व ध्वनिप्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता रहिवाशांची मनधरणी करण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची कसरत सुरू झाली. रहिवाशांचा प्रकल्पाला विरोध नसला तरी गृहसंकुलासाठी आवश्यक असलेला ॲप्रोच रस्ता हा युनी अँबेक्स या कंपनीपर्यंत ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. पुढील पाच वर्षे या प्रकल्पाचे काम सुरू राहणार आहे. विकासकामे व्हायला हवी तर त्याकरिता त्रास सोसायला हवा हे वास्तव आहे; परंतु विकासकामे करणारे ठेकेदार प्रदूषण कमी होईल, कामगार सुरक्षित राहतील, रहिवाशांची कमीत कमी गैरसोय होईल, याची पुरेशी काळजी घेत नाही. त्याचेच हे उदाहरण आहे.

मागील काही वर्षांपासून ठाण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा जटिल झाला. घोडबंदर रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. यावर उपाय म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टीकुजिनी वाडी ते बोरिवली असा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्गाचे नियोजन केले. या भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक अर्ध्यावर येणार आहे. चारपदरी असणाऱ्या या मार्गाला दोन भुयारे असणार आहेत. एक जाण्यासाठी, तर दुसरा येण्यासाठी. सध्या टीकुजिनी वाडी येथील नीळकंठ ग्रीनजवळील डोंगराजवळ हे काम सुरू आहे. टिकुजिनावाडी येथून सुरू होणाऱ्या या बोगद्याच्या कामासाठी रोज ३०० ट्रक माती काढली जात आहे. रोज ३ ते ४ लाख लिटर पाणी या कामासाठी लागत आहे. या प्रकल्पाची लांबी ११.८४ किमी, बोगद्याची लांबी १०.०८ किमी, अंदाजे खर्च १३ हजार २०० कोटी, प्रत्येक ३०० मीटरवर क्रॉस पसेज लेन, चारपदरीसह एक आपत्कालीन लेन, अग्निप्रतिबंधक यंत्रणेसह धूर नियंत्रण यंत्रणा व एलईडी लाइट्स व साइन बोर्ड लावले जातील. या प्रकल्पामुळे ठाणे-बोरिवली पूर्व पश्चिम लिंकवर थेट प्रवेश, जवळपास २३ किमी अंतर कमी होणार असून अवघ्या १२ मिनिटांत बोरिवली गाठता येणार आहे.

ज्या ठिकाणापासून या भुयारी मार्गाचे काम सुरू झाले त्या ठिकाणी यापूर्वी असलेली हिरवळ नष्ट झाली. येथील हिरवळीमुळेच अनेक रहिवाशांनी फ्लॅट घेतले. प्रकल्पाच्या कामामुळे येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. शिवाय धुळीमुळे दिवसभर घराच्या खिडक्या, दरवाजे बंद ठेवावे लागतात. भुयारी मार्गासाठी मुल्लाबाग भागातील संकुलांच्या प्रवेशद्वारावरच पथकर नाका उभारण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. दरवाजात टोलनाका नकोच, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली. रहिवाशांच्या मागणीचा विचार करीत एमएमआरडीएकडून काही बदल करण्यात येत आहेत, हिरवळ पुन्हा तयार करण्यासाठी टनेलच्या वरील बाजूची निवड केली आहे, तसेच टनेलचा मार्ग आणखी ९२ मीटर पुढे सरकविण्यात आला आहे. 

Web Title: Will the interests of citizens be protected while developing?; 12,000 residents suffer from dust in Thane -Borivali Road Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.