सुधारणार का कधी रिक्षावाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 05:59 IST2018-05-14T05:59:16+5:302018-05-14T05:59:16+5:30
ठाण्यात चार दिवसांपूर्वी दादलानीमार्गे जाणाऱ्या एका शेअर रिक्षाला अपघात झाला. रिक्षाचालकाची तंबाखू खाण्याची तल्लफ प्रवाशांना नडली आणि एकाचा जागीच मृत्यू झाला

सुधारणार का कधी रिक्षावाला?
जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाण्यात चार दिवसांपूर्वी दादलानीमार्गे जाणाऱ्या एका शेअर रिक्षाला अपघात झाला. रिक्षाचालकाची तंबाखू खाण्याची तल्लफ प्रवाशांना नडली आणि एकाचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेसह तिघे जखमी झाले. तीनपेक्षा अधिक (ओव्हरसीट) प्रवासी घेऊन जातानाच त्याच्या हलगर्जीमुळे एका व्यक्तीला नाहक जीव गमवावा लागला. वरवर पाहता ही अगदी साधी घटना वाटत असली तरी यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले. शेअर रिक्षांचे प्रश्न, शेअर रिक्षातून जादा प्रवासी नेणारे, तसेच इतर रिक्षाचालकांची गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्याची सवय, शिवाय तीन प्रवासी घेऊन जाण्याची कायदेशीर परवानगी असताना शेअर रिक्षाच्या नावाखाली सर्रास फ्रंट सीटसह पाच ते सहा प्रवाशांची वाहतूक करणे. विनापरवाना रिक्षा हाकणे, प्रवाशांशी दंडेली करणे, भाडे नाकारणे, केवळ लांबच्याच भाड्यांना प्राधान्य देणे, ठाणे रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा कशाही बेशिस्त उभ्या करून वाहतूककोंडी करणे, प्रवाशांना सौजन्याची वागणूक न देणे... अशा एकापेक्षा एक समस्यांमुळे सामान्य ठाणेकर मेटाकुटीला आला आहे. रिक्षाचालकांना सुधरवण्यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेतला होता. पण, त्यांनाही दाद दिली गेली नाही. आरटीओ, वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारीही बºयाचदा अशा बेशिस्त आणि कायदा मोडणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करतात, पण तीही लुटूपुटूची ठरते. ‘तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’, अशा उक्तीप्रमाणे ही कारवाई असते. रिक्षाचालकांचेच काही नेते आणि काही वाहतूक पोलिसांतील ‘अर्थपूर्ण’ युतीमुळेच शेअर रिक्षांमध्ये बिनधास्त चार ते पाच प्रवासी नेले जातात. या मस्तवाल वृत्तीमुळेच चालू रिक्षामध्ये तंबाखू खाण्याची तल्लफ एखाद्या रिक्षाचालकाला झाली नाही, तरच नवल!
शेअर रिक्षाचालकांनी कोणत्या मार्गावर कोणत्या वाहतूक विभागाच्या कर्मचाºयाला किती ‘बिदागी’ द्यायची, याचे दरही ठरल्याची उघड चर्चा आहे. लोकमान्यनगर ते ठाणे स्टेशन या मार्गावरून जादा सीट घेऊन जाणाºयाला दररोज ५० रुपये द्यावे लागतात. त्यानंतर, गावदेवी बसथांब्याजवळ उभे राहणाºयाने ठाणेनगरला तेवढीच रक्कम द्यायची. किसननगर ते गावदेवी जाणाºयाने १०० रुपये, तीनहातनाका ते ठाणे स्टेशन जाणारा संबंधित रिक्षावाला ठाणेनगरकडे ५०, तर कोपरी युनिटकडे १०० रुपये सोपवतात. स्टेशन ते माजिवड्यासाठी हाच दर १५० रुपये आहे, असे उघडपणे रिक्षाचालक सांगतात. त्यांच्यातील एक तथाकथित नेता ही रक्कम स्वत:जवळ जमा करतो. या रिक्षांचे क्रमांक संबंधित वाहतूक कर्मचाºयाकडे दिले जातात. हे क्रमांक पाहूनच त्यांच्यावर कारवाई टाळली जाते, असे प्रामाणिकपणे रिक्षाचा व्यवसाय करणारे सांगतात. पण, क्वचितच एखाद्या वेळी मीटरने रिक्षा चालवणाºयांनी अगदी त्यांच्या नातेवाइकाला जरी चौथी सीट म्हणून नेले, तरी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो, अशी त्यांची तक्रार आहे. ठाणे शहरात जादा प्रवासी नेणाºया अनेक रिक्षा आहेत. त्यावर नेते आणि संबंधित वाहतूक पोलिसांची ‘आर्थिक गणिते’ अवलंबून असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाईचा फार्स उरकला जातो, हेही रिक्षाचालकांनी उघड केले. दुसरीकडे वाहतूक विभागाने मात्र वारंवार कारवाई करूनही शेअर रिक्षाचालक ढिम्म असतात. ते पुन्हा जादा प्रवासी बिनधास्तपणे नेतात, असा वाहतूक विभागाचा दावा असतो.
पूर्वी ठाणे रेल्वेस्थानक परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी असायची. जवळची भाडी नाकारून सर्रास लांबची भाडी जादा दरामध्ये घेतली जायची. यालाच आळा घालण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकासमोर लोखंडी खांब असलेल्या मार्गिका तयार करण्यात आल्या. तेव्हापासून या मुजोरीला काहीअंशी चाप बसला. अलीकडे पुन्हा रेल्वेस्थानकासमोरील सॅटीस ब्रिजखाली पहिल्या तीन रांगा या खास ठरावीक रिक्षाचालकांनी मनमानीपणे राखीव केलेल्या असतात. तिथे वाटेल तशा रिक्षा लावलेल्या असतात. शिवाय, वाटेल तसे प्रवासभाडे सांगितले जाते. अगदी तीनहातनाक्यापर्यंत १५० रुपये सांगितले जातात. मग, दुसरा कोणीही २०० रुपये घेईल, असेही या टोळीकडून सांगितले जाते. आधी तिथे वाहतूक पोलिसांची चौकी होती. त्यामुळे थोडा वचक होता. आता तोही राहिलेला नाही. रात्रीही कर्मचारी बेपत्ता असतात. त्यामुळे याठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी सुरू असते.
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात अगदी ‘आरटीओ’च्या मान्यतेने ठरावीक दर आकारण्याची शेअर रिक्षाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या परिसरात काही अधिकृत, तर काही अनधिकृत रिक्षास्टॅण्ड झाले आहेत. पण, यात चालकांमध्ये शिस्तीचा प्रचंड अभाव दिसतो. बिनधास्त चार ते सहा सीट (यात मागे चार आणि पुढे चालकाच्या दोन्ही बाजूंनी दोन) नेले जातात. बºयाचदा तर या रिक्षा ओव्हरसीट किंवा फ्रंटसीट भरताना समोर वाहतूक पोलीसही उभे असतात. पण, आपल्याला काहीच दिसत नसल्याची ‘भूमिका’ ते निभावत असतात. अगदी समोरच जादा सीट भरले जात असल्यामुळे त्यांचा कोणताच धाक या रिक्षाचालकांना राहिलेला नाही. यात केवळ रिक्षाचालक किंवा पोलिसांनाही दोष देऊन उपयोग नाही. प्रवाशांनीही सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून मला कितीही घाई असली, तरीही जादा सीट झाल्यावर मी चालकाच्या बाजूला बसणार नाही, असा पवित्रा घेणे अपेक्षित आहे. पण, स्वस्तात आणि लवकर रिक्षा मिळते, म्हणून अगदी उच्चपदस्थ अधिकारीही चालकाच्या खांद्यावर हात टाकून बसलेले पाहायला मिळतात. जादा प्रवासी किंवा फ्रंट सीट केवळ पुरुषच नाही, तर महिलाचालकही सर्रास घेऊन जातात. यासाठी शासकीय यंत्रणेसह चालक आणि प्रवाशांनीही आपल्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे.
गोखले रोडवर गावदेवी भाजी मंडईबाहेर असलेल्या रिक्षास्टॅण्डमुळे प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यामुळे रिक्षास्टॅण्ड हलवण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच वाहतूक शाखेला पत्र दिले आहे. तरीही, त्याची दखल घेतली गेलेली नाही. याठिकाणी केवळ १० रिक्षा थांबवण्याची अनुमती असताना पन्नासहून अधिक रिक्षा प्रवासी घेण्यासाठी थांबतात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. याच कारणाने अनेकदा अपघातही झाले आहेत. अशाच प्रकारे मॅकडोनाल्डजवळ (जिथे स्कायवॉक सुरू होतो.) अनधिकृत शेअर रिक्षास्टॅण्ड सुरू आहे. तो बंद करण्यासाठी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आणि पालिका प्रशासनाने वाहतूक नियंत्रण शाखेला पत्र दिले. परंतु, त्याकडे वाहतूक शाखेने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. शिवाजी पथ, अलोक हॉटेलच्या बाजूलाही घोडबंदरकडे जाणाºया रस्त्यावर अनधिकृतपणे रिक्षा उभ्या असतात. तिथेही त्यामुळे सकाळ-संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूककोंडी असते. नाईकवाडीकडे मॅकडोनाल्डच्या समोर वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक शाखेने बॅरिकेट्स लावल्या आहेत. त्याही काढून रिक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (अलोक हॉटेलसमोर) उभ्या करतात. तिथेही इतकी वाहतूककोंडी होते की, चालणेही मुश्कील होते. शेअर रिक्षा प्रवासी आणि रिक्षाचालक दोघांनाही परवडते. मागणी तसा पुरवठा होत असला तरी रिक्षा कशाही आणि कुठेही उभ्या करून जादा प्रवासी आणि जादा भाडे घेऊन मनमानी करण्याला प्रवाशांचाही विरोध आहे. जादा प्रवासी भरल्यानंतर एखादा अपघात झालाच, तर प्रवाशांना विमा किंवा नुकसानभरपाईही मिळू शकणार नाही, याचे भान प्रवासी आणि रिक्षाचालक अशा दोघांनीही ठेवणे आवश्यक आहे.
शिवाईनगर, लोकमान्यनगर, यशस्वीनगरला जाणाºया शेअर रिक्षा गावदेवी येथून, तर किसननगर आणि वागळे इस्टेटला जाणाºया रिक्षा बी केबिन येथून सुटतात. याव्यतिरिक्त पवारनगरकडे जाणाºया रिक्षा राजमल ज्वेलर्ससमोर उभ्या असतात. सर्वच रिक्षांना ठरावीक भाडे आखून शेअर रिक्षासाठी (तीनपेक्षा जादा प्रवासी नव्हे) परवानगी दिली आहे. तरीही, हे दरपत्रक कोणत्याच स्टॅण्डवर लावलेले पाहायला मिळत नाही.
पालिका आयुक्तांनी वर्षभरापूर्वी रिक्षाचालकांमध्ये शिस्त येण्यासाठी एक बैठक घेतली होती. यात रिक्षाचालकांचे नेते, स्थानिक नगरसेवक आणि आमदारही उपस्थित होते. शिस्त पाळली गेली, तर महानगर गॅसचा पंप आणि रिक्षाभवन उभे करण्याचे आश्वासनही संजीव जयस्वाल यांनी दिले होते. परंतु, या बैठकीनंतरही रिक्षाचालकांमध्ये फारशी सुधारणा झाली
नाही.
मध्यंतरी, ‘मी रिक्षाचालक, मी नाही सुधारणार, मी वाहतुकीचे नियम पाळणार नाही, मी ओव्हरसीट प्रवासी वाहतूक करणार, मी रांगेत रिक्षा उभ्या करणार नाही’... अशा अनेक मुद्यांना हात घालत नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वेस्थानक परिसरात उपहासात्मक फलक लावले. त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. आता राबोडीत एका प्रवाशाचा बळी गेल्यानंतर तरी प्रवासी, रिक्षाचालक, रिक्षाचालकांचे नेते, वाहतूक पोलीस आणि आरटीओचे अधिकारी काही धडा घेतील, अशी अपेक्षा आहे.