रेशन दुकानांचा परवाना निलंबित होणार ?
By Admin | Updated: April 1, 2017 23:20 IST2017-04-01T23:20:56+5:302017-04-01T23:20:56+5:30
मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल महिन्यात साखरपुरवठा करण्यासाठी सुमारे ७५० क्विंटल साखरेच्या कोट्यास मंजुरी मिळालेली आहे

रेशन दुकानांचा परवाना निलंबित होणार ?
ठाणे : मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल महिन्यात साखरपुरवठा करण्यासाठी सुमारे ७५० क्विंटल साखरेच्या कोट्यास मंजुरी मिळालेली आहे. तिची वेळीच उचल करून रेशनिंग दुकानदारांनी मुदतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जारी केले आहेत. मात्र, दिलेल्या मुदतीमध्ये नियंत्रित साखरेची उचल न करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करून त्याविषयी अहवाल पाठवण्याची जबाबदारी संबंधित परिमंडळ कार्यालयाच्या उपनियंत्रकांवर सोपवली आहे. यामुळे रेशनिंग दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.
रेशनिंग दुकानांवर होणाऱ्या या साखरेच्या पुरवठ्यातून दारिद्रयरेषेखालील शिधापत्रिकाधारकामधील प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅमप्रमाणे हा पुरवठा होणार आहे. ग्राहकांना या नियंत्रित साखरेचा संपूर्ण कोटा मासिक परिमाणात घेता येणार आहे. यादरम्यान विक्र ीचा दर प्रतिकिलो १३.५० रुपये राहणार आहे. तसेच या साखरेची खरेदी किंमत प्रतिक्विंटल चार हजार ८८ असल्याचे येथील उपनियंत्रक शिधावाटप कार्यालयाने सांगितले आहे. या साखरेचा भिवंडीच्या शासकीय गोदामात साखरेचा पुरवठा केल्यानंतर अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी साखरेची दोन दिवसांत उचल करून शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. (प्रतिनिधी)