विद्यार्थी बनणार आता स्वच्छतादूत; पहिल्या टप्प्यात ५० शाळांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:44 AM2020-01-14T00:44:46+5:302020-01-14T00:44:58+5:30

शिक्षण विभागाचा अजब फंडा

Will now become a student of sanitation; Stage 1 school participation: | विद्यार्थी बनणार आता स्वच्छतादूत; पहिल्या टप्प्यात ५० शाळांचा सहभाग

विद्यार्थी बनणार आता स्वच्छतादूत; पहिल्या टप्प्यात ५० शाळांचा सहभाग

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून आता शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतादूत बनवण्याचा घाट घातला जात आहे. प्रत्येक विभागातील शाळांनी आपल्या भागातील १०० मीटर परिसर दत्तक घ्यावा आणि त्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतादूताचे काम करावे, असे शिक्षण विभागाला अपेक्षित आहे. परंतु, विद्यार्थी कोणत्या वेळेत काम करतील, याचा कुठेही उल्लेख शिक्षण विभागाने केलेला नाही. याउलट, ठामपा शाळांबरोबरच खाजगी शाळांनाही या योजनेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न असून पहिल्या टप्प्यात ५० शाळांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. त्यानुसार, या शाळांच्या माध्यमातून स्वच्छतादूताबरोबरच परिसराची देखभाल करणे, कोणतेही मूल शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठीचा सर्व्हे करणे आदी कामे या विद्यार्थ्यांना करावी लागणार आहेत. दीपस्तंभ योजनेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० जानेवारीच्या महासभेत शिक्षण विभागाच्या वतीने मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
हा प्रस्ताव जुलै २०१८ मध्ये महासभेतही मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. परंतु, तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर, आता पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक विभागातील शाळांनी आपल्या आजूबाजूचा १०० मीटरचा परिसर दत्तक घ्यायचा आहे. या योजनेला दीपस्तंभ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी त्यात्या परिसराचा सर्व्हे करणार असून स्वच्छतेचा दूत म्हणून महत्त्वाचे काम करणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. त्या परिसराची देखभाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

एकही मूल शाळाबाह्यराहू नये, यासाठीही प्रयत्न केला जाणार आहे. दिव्यांग मुले महापालिका शाळेतील योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे, परिसरातील एकही मूल माध्यमिक शिक्षणपासून वंचित राहणार नाही, स्वच्छतादूत बनतानाच विद्यार्थ्यांनी त्या परिसरातील नागरिकांना स्वच्छतेविषयी महत्त्व सांगणे, याशिवाय शाळा तंबाखूमुक्त घोषित करताना परिसरही तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, अशा काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत शाळांकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यासाठी समिती गठित केली जाणणार आहे. त्यानुसार वर्षभरात केलेल्या कामाचा अहवाल शाळांनी सादर करायचा असून त्यातून ५० शाळांचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यानंतर, या उपक्रमात अव्वल ठरणाºया शाळेला पहिल्या, दुसºया आणि तिसºया क्रमांकांचे बक्षीस दिले जाणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५० हजारांचे असणार आहे. या योजनेसाठी २५ लाखांची तरतूद केली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

महानगरपालिकेच्या दीपस्तंभ योजनेंतर्गत शालेय मुले कोणत्या सत्रात हे काम करणार, अभ्यास करून त्यांना ही कामे करता येणे शक्य होणार आहे का, या सर्व बाबींचा विचार मात्र या प्रस्तावात कुठेही झालेला दिसला नाही. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शाळेला तशा सूचना आणि परिपत्रक दिले जाणार आहे.

शाळांनी राबविलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन आणि कामाच्या देखरेखीसाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत शिक्षण विभागाचे सभापती, अतिरिक्त आयुक्त (२), शिक्षण विभागाचे उपायुक्त, समाजकल्याण अधिकारी, सहायक आयुक्त आणि गटअधिकारी राहतील.

Web Title: Will now become a student of sanitation; Stage 1 school participation:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.