दुकानाच्या लिलावानंतर मिळणार गुंतवणूकदारांना पैसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:54 PM2019-11-04T23:54:09+5:302019-11-04T23:54:32+5:30

‘गुडविन’ प्रकरण : डोंबिवलीतील एका दुकानाची आज तपासणी

Will investors get money after goodwin shop auction? | दुकानाच्या लिलावानंतर मिळणार गुंतवणूकदारांना पैसे?

दुकानाच्या लिलावानंतर मिळणार गुंतवणूकदारांना पैसे?

googlenewsNext

सचिन सागरे 

कल्याण : गुडविन ज्वेलर्सचीठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये चार दुकाने आहेत. त्यापैकी केवळ डोंबिवलीतील एक दुकानच स्वत:च्या मालकीचे आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर या दुकानाची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग सुकर होण्याचीही शक्यता आहे. तर, इतर भाड्याच्या दुकानांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती मूळ मालकांना परत मिळणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

‘गुडविन’चे संचालक सुनीलकुमार व सुधीशकुमार यांनी गुंतवणूकदारांना भिशी, ठेवी आणि दुप्पट पैसे देण्याचे प्रलोभन दाखवत कोट्यवधी रुपये गोळा करून पोबारा केला आहे. डोंबिवलीतील ६९ गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून त्यांची तीन कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोघा बंधूंविरोधात गुन्हा नोंदवत लुकआउट नोटीस जारी केली आहे. ठाणे, डोंबिवली व अंबरनाथ येथील दुकानांची ठाणे गुन्हे आर्थिक शाखेने तपासणी केली. त्यापैकी तीन दुकानांची तपासणी पूर्ण झाली असून, उर्वरित डोंबिवलीतील एका दुकानाची तपासणी मंगळवारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या तपासात ज्वेलर्सच्या मालकीचे एक दुकान आढळले आहे. तपास पूर्ण होताच त्या दुकानाचा लिलाव होणार आहे. त्यानंतरच डोंबिवलीतील गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
डोंबिवलीतील दोन दुकानांपैकी एक दुकान हे ज्वेलर्सच्या मालकीचे आहे. तर, दुसरे दुकान ८० हजार रुपये मासिक भाडेतत्त्वावर १५ वर्षांसाठी घेतले आहे. त्यासाठी २० लाख अनामत रक्कम भरली आहे. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुकानमालकाला न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर, पोलिसांची आणि न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालकाला त्याचा गाळा परत मिळेल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

‘कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा’
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गुडविनच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांनीही जादा टक्क्यांच्या व्याजाचे प्रलोभन दाखवून ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कर्मचाºयांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज काही ग्राहकांनी रामनगर पोलिसांना दिला आहे. या मागणीच्या आधारे काँग्रेसचे नेते संतोष केणे यांनीही कर्मचाºयांची चौकशी व्हायला हवी, असे म्हटले आहे.
मुदत ठेवीमध्ये १६ टक्के वार्षिक व्याजाचे प्रलोभन दाखवून गुंतवणूक करवून घेतल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात २ नोव्हेंबरला केल्याचे केणे यांनी सांगितले. ग्राहक राकेश मिश्रा, सुनील प्रसाद, किशोर महाजन, अनंत उरणकर, नरेंद्र चौधरी, श्वेता श्रुंगारपुरे या सगळ्यांनी मिळून गुडविन ज्वेलर्समध्ये एक कोटी दोन लाख ८७ हजारांची गुंतवणूक केल्याचे तक्रारीवरून उघडकीस आले आहे.
ग्राहक दिवाळीदरम्यान गुडविनच्या दुकानात गेले असता तेथे त्यांना दोन दिवस दुकान बंद राहणार असल्याचे समजले. मात्र, त्यानंतर आतापर्यंत ते दुकान न उघडल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळले. त्यामुळे लाखोंची गुंतवणूक पुन्हा मिळणार की नाही, याची कोणतीच हमी नाही. त्यामुळे गुडविनचे संचालक, कर्मचारीही तेवढेच जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जादा व्याजाचे प्रलोभन दाखवणाºया चंद्रिका नायर, मुनीर अब्दुल, कोशी जॅकब, हरिदर, वेणुगोपाल नायर आदींवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
 

Web Title: Will investors get money after goodwin shop auction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.