बोगस मतदारांचा समावेश असलेल्या यादीनुसार होणार निवडणूक? आयोग, नगरपालिकेत समन्वयाचा अभाव : काँग्रेसची प्रशासनावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:54 IST2021-02-27T04:54:31+5:302021-02-27T04:54:31+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीच्या विधानसभा निवडणुकीवेळी तयार केलेली मतदारयादी ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ...

बोगस मतदारांचा समावेश असलेल्या यादीनुसार होणार निवडणूक? आयोग, नगरपालिकेत समन्वयाचा अभाव : काँग्रेसची प्रशासनावर टीका
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीच्या विधानसभा निवडणुकीवेळी तयार केलेली मतदारयादी ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या मतदारयादीत जी बोगस नावे होती, ती काढून टाकण्यासाठी ज्या हरकती मतदार नोंदणी कार्यक्रमादरम्यान घेण्यात आल्या होत्या, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. बोगस नावे काढून टाकल्याखेरीज यादी ग्राह्य मानण्यास विरोध होत आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेसाठी विधानसभेची १५ जानेवारी २०२१ रोजी जी मतदारयादी तयार करण्यात आली त्या मतदार यादीनुसार निवडणुकीचे काम सुरू करण्यात आले. मात्र त्या यादीतील बोगस नावांसंदर्भात काँग्रेसच्या उमेदवारांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्या हरकतींवर तहसीलदार कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. बोगस नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात आली. काँग्रेसचे उमेश पाटील आणि किरण राठोड यांनी याप्रकरणी हरकत घेतली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे ही कार्यवाही करण्यात आली. मात्र आयोग व नगरपालिका या दोन शासकीय कार्यालयांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचा फटका उमेदवारांना बसला. मतदार यादीमधील बोगस नावे उघड झालेली असताना आणि ती वगळण्याचे आदेश असतानाही ती वगळण्याबाबत विलंब केला जात आहे. पालिका प्रशासन ती बोगस नावे मतदारयादीत समाविष्ट असताना त्याआधारे निवडणूक घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत. यासंदर्भात राठोड आणि पाटील यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र आयोगाचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत आम्ही काही करणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.
.............
‘‘ आयोगाकडून आम्हाला १५ जानेवारीच्या यादीनुसार काम करण्याचे आदेश आले आहेत. ती यादी घेऊन आम्ही काम सुरू केले आहे. त्यानंतर काही नावे वगळण्याचे आदेश आले असतील, तर त्यासंदर्भात आम्हाला आयोगाकडून आदेश येणे गरजचे आहे. आम्हाला आदेश आल्यावरच आम्ही पुढील कार्यवाही करू.
-डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी. अंबरनाथ नगरपरिषद
..............
वाचली