विश्वास’ची विशेष मुले होणार फुलपाखरे!
By Admin | Updated: March 24, 2017 01:12 IST2017-03-24T01:12:10+5:302017-03-24T01:12:10+5:30
: रंगीबेरंगी पंख लावून फुलपाखरू होण्याचा आनंद लुटणार आहेत, ती विश्वास गतिमंद संस्थेतील विशेष मुले

विश्वास’ची विशेष मुले होणार फुलपाखरे!
ठाणे : रंगीबेरंगी पंख लावून फुलपाखरू होण्याचा आनंद लुटणार आहेत, ती विश्वास गतिमंद संस्थेतील विशेष मुले. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत ही मुले फुलपाखरे होणार असून समाजाने आपल्याशीदेखील संवाद साधावा, असा संदेशच यानिमित्ताने ते देणार आहेत.
ठाण्यात दरवर्षी काढल्या जाणाऱ्या स्वागतयात्रेत गेली १२ वर्षे विश्वास गतिमंद संस्था चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी होत असते. वेगवेगळ्या थीमवर चित्ररथ तयार केले जातात. यात मुलांबरोबर त्यांचे पालकही उत्साहाने सहभागी होत असतात. गेल्या १२ वर्षांत संस्थेने विविध सामाजिक विषय हाताळले आहेत. कधी पहिले, दुसरे, तिसरे, तर कधी उत्तेजनार्थ पारितोषिकही संस्थेने या स्वागतयात्रेत पटकावले आहे. यंदा संस्था फुलपाखरू या विषयावर आधारित आपला चित्ररथ तयार करणार आहे. चित्ररथावर फुलपाखराचे चित्र काढले जाणार आहेत. त्याचबरोबर संस्थेची मुले ही स्वत: फुलपाखरे होणार आहेत.
ही मुले सर्वसामान्यांपेक्षा वेगळी आहेत. त्यांच्याकडे विशेष मुले म्हणून पाहिले जाते. समाज अशा मुलांशी संवाद साधत नाही. या मुलांशी संवाद साधला, तर जसा फुलपाखराला पाहिल्यावर आपल्याला आनंद मिळतो, तसा या मुलांबरोबर मिळेल, हा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे शैलेश साळवी यांनी सांगितले.
ही मुले फुलपाखरांसारखीच नाजूक, तरल आहेत. समाजाशी संवाद साधण्यास उत्सुक आहेत. फक्त समाजाने एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा असल्याचे साळवी यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने या मुलांसाठी निवासीसंकुल उभारले जाणार आहे. या संकुलात संस्थेतील काही मुले गटागटांनी जाणाऱ्या फुलपाखरांसारखी दाखल होणार आहेत. त्यामुळे ही मुले या स्वागतयात्रेत फुलपाखरे होणार आहेत. सध्या ही मुले, त्यांचे पालक, स्वयंसेवक फुलपाखरे बनवण्यात गुंतले आहेत. (प्रतिनिधी)