हॉटेलमध्ये सर्रास गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:40+5:302021-03-22T04:36:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने दुसरीकडे सरकारने घातलेल्या निर्बंधांना सर्रास पायदळी तुडवले जात ...

हॉटेलमध्ये सर्रास गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने दुसरीकडे सरकारने घातलेल्या निर्बंधांना सर्रास पायदळी तुडवले जात आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून महापालिका प्रशासनाने सरकारच्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली. दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला शंभरीपार झाल्याने, महापालिकेची चिंता वाढली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन केले जाते की नाही, याची शहानिशा महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे स्वतः करीत आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी २० तर लग्नसमारंभाला ५० नागरिकांची मर्यादा ठरविली असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होऊनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या आदेशाला सर्रासपणे पायदळी तुडविले जात असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हॉटेलमध्ये कोणत्याही निर्बंधांविना नागरिकांना प्रवेश दिले जात असून हॅण्डवॉश, सॅनिटायझरचा वापर, मास्क न लावणे, थर्मल स्क्रीनिंग केले जात नसल्याची टीका होत आहे. महापालिका पथक व पोलीस विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रवेशद्वार येथील हॅण्डवॉश बंद केले असून थर्मल स्क्रीनिंगची मशीन गेली कुठे, असा प्रश्न नगरिकांकडून व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्तांनी नागरिकांनी स्वतःहून सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.