वानखेडेंच्या विरोधातील कारवाई का बारगळली?
By Admin | Updated: April 26, 2017 00:18 IST2017-04-26T00:18:10+5:302017-04-26T00:18:10+5:30
केडीएमसीचे ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांच्याविरोधात कारवाई करून त्याबाबतचा अहवाल एप्रिलच्या महासभेत मांडण्यात येईल

वानखेडेंच्या विरोधातील कारवाई का बारगळली?
कल्याण : केडीएमसीचे ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांच्याविरोधात कारवाई करून त्याबाबतचा अहवाल एप्रिलच्या महासभेत मांडण्यात येईल, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मार्चमध्ये झालेल्या महासभेत दिले होते. मात्र, एप्रिलच्या नुकत्याच झालेल्या महासभेत हा अहवालच सादर न केल्याने त्यांना महापालिका प्रशासन व महापौर पाठीशी घालत आहेत, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी केला आहे. याप्रकरणी उगले यांनी महासभेत सभात्याग करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
मार्चच्या महासभेत शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी सभा तहकुबीची सूचना मांडली होती. वानखेडे हे बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करीत नाहीत. बेकायदा बांधकामांविरोधात नगरसेवकांनी तक्रार केली, तर तक्रारदारांना तक्रार करणाऱ्या नगरसेवकाचे नाव सांगतात. बेकायदा बांधकामप्रकरणी समर्थन करणाऱ्या व हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द केले जाते. मात्र, केडीएमसीत बेकायदा बांधकामांविरोधात आवाज उठवणाऱ्या नगरसेवकांना महापालिकेचे प्रभाग अधिकारी साथ न देता बेकायदा बांधकामधारकांच्या पाठीशी उभे राहून त्याला अभय देतात. अशा प्रकारचे काम वानखेडे यांनी केले आहे, असा आरोप समेळ यांनी केला होता. त्यामुळे त्यांना निलंबित न करता थेट महापालिका सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी समेळ यांनी केली होती. त्यांच्या या मागणीचे जोरदार समर्थन उगले यांनी केले होते.
महापौरांनी प्रशासनाला आदेश देत पुढील महिन्याच्या महासभेत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. या महिन्यात झालेल्या महासभेत उगले यांनी वानखेडे यांच्याविरोधात कारवाई काय करणार, त्यांच्या अहवालाचे काय,
असा सवाल उपस्थित केला असता महापौरांनी उगले यांना बोलू दिले नाही. त्यामुळे उगले यांनी सभात्याग केला. (प्रतिनिधी)