राजकीय हत्येचे पाप कोणाच्या माथ्यावर?
By Admin | Updated: December 6, 2015 00:42 IST2015-12-06T00:42:19+5:302015-12-06T00:42:19+5:30
वेगवेगळ््या हत्या, हल्ले, गैरव्यवहार आणि सूडाच्या नाट्याने दिवसेंदिवस जीवघेण्या होत गेलेल्या ठाण्याच्या राजकारणावर आता राजकीय हत्येच्या तपासाचे वादळ

राजकीय हत्येचे पाप कोणाच्या माथ्यावर?
ठाणे : वेगवेगळ््या हत्या, हल्ले, गैरव्यवहार आणि सूडाच्या नाट्याने दिवसेंदिवस जीवघेण्या होत गेलेल्या ठाण्याच्या राजकारणावर आता राजकीय हत्येच्या तपासाचे वादळ घोंगावू लागले आहे. बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात शरण आलेल्या चार नगरसेवकामुळे आणि डायरीतील नावांमुळे आधीच चिखलात रूतलेल्या राजकारण्यांना सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी गोत्यात आणले.
परमार आत्महत्येप्रकरणी शरण आलेल्या नगरसेवकाच्या चौकशीत २५ वर्षांपूर्वीच्या राजकीय खुनाला वाचा फुटेल. त्याबाबत तपास चालू आहे, असे मोघम उत्तर देत त्यांनी उत्सुकता वाढवली असली, तरी खून झालेली व्यक्ती कोण याचा उलगडा केला नसल्याने तर्कर्वितर्कांना उधाण आले. २५ वर्षांपूर्वी सत्तेत कोण होते, सत्तेच्या परीघात कोण होते, कोणत्या पक्षाचे होते, याचे अंदाज बांधले जाऊ लागले. सध्या राजकारणात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींपैकी कोणाचा सहभाग या प्रकरणात आहे का, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. संपत्तीचा वाद, राजकीय गद्दारी की रिक्षा संघटनेच्या वर्चस्वाचा संघर्ष याला कारणीभूत आहे, यावरही तर्क लढवले जाऊ लागले.
वातावरण ढवळले
वेगवेगळ््या गैरव्यवहारांमुळे आधीच ठाण्याचे राजकारण प्रदूषित झाले आहे. त्यातही एरवी वेगळ््या पक्षात असलेल्या पण राजकीय लाभासाठी एकत्र येणाऱ्या नेत्यांमुळे, त्यांच्या जरबेमुळे, त्यांच्या वर्चस्व संघर्षामुळे ठाणेकर वेठीला धरले जातात. आता राजकीय हत्येच्या वादामुळे वातावरण पक्षीय वातावरण ढवळून निघाले आहे.