आम्ही चालायचे कुठे?
By Admin | Updated: February 9, 2017 03:56 IST2017-02-09T03:56:19+5:302017-02-09T03:56:19+5:30
रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल आणि त्याला लागून असलेला स्कायवॉकचा संपूर्ण ताबा हा फेरीवाल्यांनी मिळविला आहे. या फेरीवाल्यांनी पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाही शिल्लक ठेवलेली नाही

आम्ही चालायचे कुठे?
पंकज पाटील,अंबरनाथ
अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल आणि त्याला लागून असलेला स्कायवॉकचा संपूर्ण ताबा हा फेरीवाल्यांनी मिळविला आहे. या फेरीवाल्यांनी पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाही शिल्लक ठेवलेली नाही. स्कायवॉकवरुन जाण्यासाठी पादचाऱ्यांना फेरीवाल्यांच्या विळख्यातून मार्ग काढत पुढे सरकावे लागत आहे. स्कायवॉकचा ताबा हा पालिकेकडे असतानाही प्रशासन या फेरीवाल्यांवर कारवाई करताना दिसत नाही.
अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा बसलेला असतानाच आता या फेरीवाल्यांनी पादचारी पुलाचाही ताबा घेतला आहे. रेल्वे स्थानक परिसर गचाळ केल्यावर या फेरीवाल्यांनी आता रेल्वे पुलावर आपला मोर्चा वळविला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसत असून काही फेरीवाले पुलाच्या मध्यभागी उभे राहून व्यवसाय करत आहेत. रेल्वे पुलासोबत काही फेरीवाल्यांनी पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकचाही ताबा मिळविला आहे. स्थानकाला लागून असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांनी हा संपूर्ण परिसर व्यापला आहे. रेल्वे पुलावर बसून भाजी आणि फळ विक्री करताना त्यांची दादागिरी आणि गैरवर्तवणुकीचा फटका नागरिकांना बसत आहे.
मागील १५ दिवसांपासून रेल्वे सुरक्षा दलाने या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मोहीम थंड केल्यावर फेरीवाल्यांचा व्याप जास्तच वाढला आहे. मिळेल तिथे फळ आणि भाजी विक्री केली जात आहे. रेल्वे पुलाची जबाबदारी पालिका आणि रेल्वे प्रशासन दोघांवर आहे. मात्र पालिका प्रशासन कधीच या पुलावर कारवाई करीत नाही. एवढेच नव्हे तर हक्काच्या स्कायवॉकवरही पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करताना दिसत नाही.
एखाद्या पादचाऱ्याचा पाय फेरीवाल्यांच्या टोपलीला किंवा ठेवलेल्या मालावर पडला तर हे फेरीवाले अंगावर धावून येतात. नुकसान झाले असे कारण पुढे करुन भरपाई मागण्यास सुरुवात करतात. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने चुकून पाय लागण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती पालिका प्रशासनला आहे. मात्र कारवाईसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. ज्या स्टेशन चौकात पोलीस चौकी दिली आहे त्याच चौकीला लागून सर्व फेरीवाले बसलेले असल्याने पोलीसही या फेरीवाल्यांपुढे हतबल झाले आहेत.