कोरोनाचे गांभीर्य कळणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:11+5:302021-05-25T04:45:11+5:30
डोंबिवली : सद्य:स्थितीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मात्र ...

कोरोनाचे गांभीर्य कळणार तरी कधी?
डोंबिवली : सद्य:स्थितीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मात्र कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी केडीएमसीने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंधांचे उल्लंघन होतच आहे. अत्यावश्यक कामेवगळता सकाळी ११ नंतर नागरिकांना संचारबंदी लागू असताना नागरिक बेफिकीरपणे वावरत असल्याचे मनपा आणि पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. विनामास्क आणि विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई आणि त्यांची अँटिजन चाचणी करणे सुरू करूनही लोकांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही.
सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु डोंबिवलीत नेमके उलटे चित्र पहायला मिळत आहे. सकाळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडत आहे. सकाळी ११ नंतर अत्यावश्यक कामांव्यतिरिक्तही काहीजण नाहक फिरतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. नागरिक सकाळी व संध्याकाळी फेरफटक्याच्या नावाखाली सर्रास फिरत आहेत. काहींच्या चेहऱ्यावर मास्कही नसतो. हे चित्र डोंबिवली पश्चिमेकडील खाडी किनारे, भागशाळा मैदान, गुप्ते रोड, विष्णूनगर पोस्ट ऑफिसलगतचा रस्ता, पूर्वेकडील फडके रोड, छेडा रोड, घरडा सर्कल, शेलार चौक, ठाकुर्लीतील ९० फिट रोड, समांतर रस्त्यावर पाहायला मिळत आहे.
-----
दंडात्मक कारवाई आणि अँटिजन चाचणी सुरूच
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी मनपा आणि पोलीस विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ७ ते ८ दिवसांत मास्क न वापरणाऱ्या ४२५ जणांवर दंडात्मक, तर विनाकारण फिरणाऱ्या एक हजार ८६३ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात काहीजण कोरोनाबाधित आढळले. रविवारी डोंबिवली पश्चिमेला ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि विष्णूनगर पोलीस ठाणे यांच्या वतीने कुंभारखाण पाडा, खंडोबा मंदिर परिसरातील खाडीकिनारी विनाकारण फिरणाऱ्या ३२ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात दोघेजण कोरोनाबाधित आढळले.
--------------------------------------------
फोटो आहे